नित्याच्या वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:01+5:302021-02-09T04:12:01+5:30
सुरक्षिततेच्या तुटपुंज्या उपाययोजना करून एकाच वेळी दुतर्फा संथगतीने काम सुरु असल्यामुळे नागरिकांना दररोजच वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत ...
सुरक्षिततेच्या तुटपुंज्या उपाययोजना करून एकाच वेळी दुतर्फा संथगतीने काम सुरु असल्यामुळे नागरिकांना दररोजच वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस हतबल झाले आहेत.
सध्या पुणे-नगर राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा रस्ता रुंदीकरणाचे व पावसाळी नाल्यांचे काम सुरु आहे. नगर महामार्गावर रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. तसेच वाघोली हे गाव मराठवाडा, विदर्भाला जोडणारे महत्त्वाचे केंद्रबिंदू असल्यामुळे या महामार्गावरून वाहनाची प्रचंड वर्दळ असते. सध्यस्थितीत रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून संबंधित विभाग व ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काम चालू असल्यामुळे व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या तुटपुंज्या उपाययोजनांमुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी काम केल्यास काम लवकर मार्गी लागेल व नागरिकांना कोंडीपासून सुटका मिळेल. अशी मागणीदेखील नागरिकांमधून केली जात आहे. दररोजच्या होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलीससुद्धा हतबल झाले आहेत. वाहतूककोंडीमुळे पोलिसांना नागरिकांचा रोष पत्करावा लागत आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप मानकर लोणी कंद पोलीस स्टेशनला रुजू होताच त्यांनी विविध उपाययोजना करून वाहतूककोंडी सोडविण्यात यश मिळविले होते. परंतु सध्या संथगतीने सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूककोंडीची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होत असून, पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. लोणी कंद पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवीस गावे येतात. यामध्ये काही गावे संवेदनशील तर काही गावे अतिसंवेदनशील आहेत. गंभीर गुन्हे, बंदोबस्त, न्यायालयीन कामकाज, अपघात अशा विविध कामकाजासाठी धावपळ करावी लागते. पोलीस स्टेशनला असलेले कमी पोलीस बळ आणि वाढता कामाचा व्याप यामुळे पोलिसांना प्रचंड ताण सहन करत वाहतूक कोंडीची जबाबदारी पेलावी लागत आहे. संबधित विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना केवळ पोलिसांना दोष देऊन त्यांच्यावर खापर फोडले जात आहे.
प्रतिक्रिया :
रस्ता रुंदीकरणाच्या संथगतीने चाललेल्या कामामुळे वाहनधारकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. उपाययोजनाअभावी अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. तत्काळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात. रात्रीच्या वेळी काम केल्यास नागरिकांना कोंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे मत जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया :
पुणे-नगर महामार्ग रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षिततेबाबत संबंधितांना सूचना केल्या जातील. - मिलिंद बारभाई (सार्वजनिक बांधकाम विभाग)
पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच झालेली वाहतूककोंडी
सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही ठोस उपाययोजना न करता चालू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम