नागरिकांनी शरीराचं डस्टबिन केलं- जगन्नाथ दीक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 02:59 AM2019-01-28T02:59:01+5:302019-01-28T06:40:40+5:30
आपले आरोग्य आपल्या हाती यावर मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे : जेवण फुकट कसे घालवायचे, या विचारातून आपल्या देशाच्या महिला लठ्ठ झाल्या आहेत. आपण घरातल्या डस्टबिनची काळजी करतो. शरीराचे मात्र डस्टबिन केले आहे. त्याची काळजी करत नाही. यामुळेच अनावश्यक वजन वाढते. पोटाचा घेर वाढतो. गुडघेदुखीचा, स्नायूदुखीचा त्रास उद्भवतो. चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना टाइप -१ चा डायबेटिस होतो, तर ज्येष्ठांना टाईप- २ चा डायबेटिस होतो, असे प्रतिपादन डाएट सल्लागार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या पटांगणात ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ अर्थात विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषावर ते बोलत होते.
कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक तथा संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांनी प्रास्ताविक केले. जीवनशैलीशी निगडित रोगावर जीवनशैली बदल हाच खरा उपचार असू शकतो. भूक ही बऱ्याचदा मानसिक असते. भूकेपेक्षा कमी खावे. खाण्याविषयी जागरूकता ठेवा. ४५ मिनिटांत ४.५०० ते ५ किलोमीटर चालावे. भारतातील २० टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन निर्माण झाल्यामुळे डायबेटिस होतो. वारंवार खात राहिलात तर, इन्शुलिनची पातळी वाढेल. यामुळे दोन वेळा आणि खाणेपिणे ५५ मिनिटांत आटोपा. सहा ते आठ तास झोप घेतल्यावर दिवसातून दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या. गरज वाटलीच तर जेवताना घोट घोट पाणी प्या. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या, असा सल्ला त्यांनी दिला.
दिवसातून फक्त दोन वेळा जेवण करा. अवघ्या तीन महिन्यांत वजन कमी होईल. पोटाचा घेर कमी होईल. डायबेटिस दूर होईल अशी जाहीर हमी त्यांनी दिली. आपल्याकडे दोन वेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पद्धत नव्हती. भगवान राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेद किंवा ग्रंथात नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला. त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरू झाला.
उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही
दिवसातून दोन वेळा जेवा असा उल्लेख आयुर्वेदात आहे. दोन वेळा जेवा, पुण्य मिळेल असे त्यात म्हटले आहे. कितीतरी खाण्याने जास्त लोक मरतात. पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही. आपण ६० दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायची, तेव्हाच खायचे, नाही तर उपाशी राहायचे. तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरू करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात आरोग्याच्या विविध समस्यांवर विनाखर्च, विनायंत्र, विना डाएटिंग उपाययोजनांबद्दल डॉ. दीक्षित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, वडगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माया भेगडे, किशोर भेगडे, गणेश काकडे, दीपक हुलावळे, प्रवीण झेंडे, सुभाष जाधव, अशोक घारे, शोभा कदम, बाळासाहेब विनोदे, ज्ञानेश नवले, अंकुश आंबेकर, स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष भवरमल ओसवाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.