चीन, जर्मनी, जपानच्या नागरिकांनाही महाराष्ट्रातील शहरांची भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 04:26 PM2022-01-31T16:26:02+5:302022-01-31T16:27:28+5:30
तंत्रज्ञान व कौशल्याची देवाण घेवाण करण्यासाठीही हे कर्मचारी, कामगार शहरातील कंपन्यांमध्ये येत आहेत...
नारायण बडगुजर
पिंपरी : कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेलेला असतानाच काही बहुराष्ट्रीय तसेच स्थानिक कंपन्यांमुळे स्थानिकांसह परदेशी नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे महामारीतही त्यांना दिलासा मिळाला. कोरिया रिपब्लिक, चीन, जर्मनी व जपान या वेगवेगळ्या देशातील नागरिकांचे शहरात रोजगारानिमित्त वास्तव्य आहे. यात कुशल कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने आहेत. तंत्रज्ञान व कौशल्याची देवाण घेवाण करण्यासाठीही हे कर्मचारी, कामगार शहरातील कंपन्यांमध्ये येत आहेत.
कोरोना महामारीमुळे झालेल्या लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहर व परिसरातील औद्योगिक आस्थापना देखील बंद होत्या. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले इतर उद्योग देखील बंद होते. परिणामी लाखो कामगारांना घरात बसून रहावे लागले होते. यात मल्टीनॅशनल कंपन्यांतील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र अनलाॅक झाले, निर्बंध शिथिल करण्यात आले, त्यामुळे एमआयडीसीतील उद्योग पुर्ववत सुरू झाले. कामगारांमुळे औद्योगिक परिसरात चैतन्य आले.
कंपन्यांकडून दिले जातेय प्रशिक्षण
निर्बंध शिथील होताच एमआयडीसीत काही उद्योगांनी गुंतवणूक वाढविली. त्यात नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. यातील प्रशिक्षित कामगारांना परदेशातून पाचारण करण्यात आले. संबंधित आस्थापनांनी त्यासाठी कर्मचारी, कामगारांना एम्प्लायमेंट व्हिसा उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे परदेशातील काही कुशल कर्मचारी, कामगार प्रशिक्षण देण्यासाठी काही कंपन्यांमध्ये दाखल झाले. तसेच येथील कंपन्यांमधील अद्ययावत तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी देखील काही परदेशी कंपन्यांनी त्यांच्याकडील कर्मचारी, कामगारांना पाठवले. प्रशिक्षण घेऊन ते कामगार मायदेशी परतणार आहेत.
परकीय नागरिक विभागाकडे नोंदणी
परकीय नागरिक नोंदणी विभागाकडे परदेशी नागरिकांची नोंद केली जाते. विदेश मंत्रालय तसेच केंद्रीय गृहमंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागाचे कामकाज चालते. रोजगार, कामानिमित्त येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी एम्प्लाॅयमेंट व्हिसा दिला जातो. संबंधित आस्थापना, कंपनी तसेच परदेशी नागरिक यांच्याकडून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली जाते.
चीनलाही भारतीयांच्या कौशल्याची भुरळ
कृत्रीम सूर्य आणि चंद्र तयार करणारा चीन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या चीनी नागरिकांनाही भारतीयांच्या कौशल्याची भुरळ पडल्याचे दिसून येते. चीनी वस्तू स्वस्त मिळत असल्या तरी काही भारतीय उत्पादने व वस्तू त्याहीपेक्षा स्वस्त आहेत. तसेच काही बाबतीत भारतीय तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यासाठी चीनी कर्मचारी व कामगार देखील शहरात वास्तव्य करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील परदेशी कर्मचारी, कामगार
चीन - ११
जर्मनी - १९
जपान - १३
कोरिया रिपब्लिक - १११