पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी
By राजू हिंगे | Published: March 11, 2024 02:52 PM2024-03-11T14:52:28+5:302024-03-11T14:53:45+5:30
जलपर्णी वाढल्याने केशवनगर, मुंढवा परिसरात नदीला हिरवळीचे स्वरूप आल्याने डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढून नागरिक हैराण झाले होते
पुणे : नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्याने केशवनगर, मुंढवा परिसरात नदीला हिरवळीचे किंवा मैदानाचे स्वरूप आले आहे. त्याशिवाय डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढून हैराण झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने जलपर्णी हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पाच जेसीबी, तीन स्पायडर मशिन , चार बोटी आणि ३० मंजुराच्या सहाय्याने ही जलपर्णी काढण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नदीने जलपर्णीपासुन मोकळा श्वास घेतला आहे.
खराडी नदीपात्रासोबत कात्रज, पाषाण, जांभुळकर तलाव आणि मुळामुठा नदीत जलपर्णीची समस्या मोठी आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढते. महापालिकेच्या वतीने कल्याणीनगर येथे नदीपात्रात पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीपात्रात बंड उभारण्यात आला आहे. त्यामुळे अधिक पाणी साचून यंदा येथील जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या परिसरात जलपर्णीमुळे डास व किटकांचा उपद्रव वाढला आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर तातडीने चारपट यंत्रसामुग्री वापरून तातडीने जलपर्णी काढून टाकण्याच्या सूचना आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार या परिसरातील जलपर्णी काढण्यासाठी मोठयाप्रमाणात मोहिम राबविण्यात आली.
केशवनगर, मुंढवा, जॅकवेल आणि गोदरेजपुल परिसर या दिड किलोमीटरच्या अंतरामध्ये जलपर्णी मोठया प्रमाणात वाढली होती. त्यासाठी पाच जेसीबी, तीन स्पायडर मशिन , चार बोटी आणि ३० मंजुराच्या सहाय्याने ही जलपर्णी काढण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नदीने जलपर्णीपासुन मोकळा श्वास घेतला आहे. मच्छर आणि डासांचा प्रादुर्भावही कमी झाला आहे.