भुयारी मेट्रोमुळे पेठांमधील नागरिकांमध्ये धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 08:14 PM2018-08-24T20:14:48+5:302018-08-24T20:48:00+5:30
साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्टेशन असून, ही मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असणार आहेत.
पुणे: शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरु असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरु होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून, आधुनिक तंत्राचा वापर करून हे काम करण्यात येणार आहे. भुयारी मर्गावर अनेक जुने वाडे, घरे येत असून, भुयारीमार्गाचे काम करताना या जुन्या वाड्यांना, घरांना धोका पोहोचू शकतो. यामुळे तब्बल ३२५ कुटुंबांचे भुयारी मेट्रो मागार्मुळे स्थलांतर करावे लागणार आहे. यामुळे सध्या पेठांमधील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १६ किलोमीटरच्या मार्गामध्ये कृषी महाविद्यालय ते स्वारगेट असा सुमारे ५.२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जमिनीच्या खाली भुयारी असणार आहे. यामध्ये दोन बोगद्यांमधून येणारी आणि जाणारी अशा दोन मेट्रो धावणार आहे. या कामासाठी महामेट्रोच्या वतीने नुकत्याच निविदा प्रसिध्द केल्या असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रोच्या भुयारी मागार्चे प्रमुख प्रमोद आहुजा यांनी दिली.
या साडेपाच किलोमीटरच्या भुयारी मार्गावर एकूण ५ भुयारी मेट्रो स्टेशन असून, ही मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली १६ ते २८ मीटर खाली असणार आहेत. मेट्रो स्टेशनमध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर,न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट याचा समावेश आहे. या मेट्रो स्टेशनसाठी प्रत्येकी सरासरी १० मीटरच जागा मेट्रोला लागणार आहे. भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने खोदकाम करताना हादरे बसत नाहीत, तसेच कंपने देखील फार दूरवर जात नाहीत. यामुळे भुयारी मार्गामुळे लगतच्या बांधकामांना कोणताही धोका नसल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.
असे होणार भुयारी मार्गाचे काम
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गात एक जाण्यासाठी व एक येणा-या मेट्रोसाठी असे दोन टनेल असणार आहेत. हे भुयारी मार्ग सुमारे १६ ते २८ मीटर खोल असून, यासाठी आधुनिक ४ टनेलिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे. बोगदा करण्यासाठी कृषी महापाविद्यालय आणि स्वारगेट येथे दोन मोठे खड्डे खोदण्यात येणार असून येथूनच साडे पाच किलो मीटरचे बोगदे करण्यासाठी आवश्यक असलेल्या टनेलिंग मशिन मजिनीत घालण्यात येणार आहेत. पुण्यात बहुतेक सर्व ठिकाणी बेसॉल्ट खडक असल्याने कोणत्याही अडचण येणार नसल्याचा मेट्रोचा दावा आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचे काम सुरु झाल्यानंतर किमान एक वर्षे काम पूर्ण होण्यासाठी लागतील.
--------------------
भुयारी मार्गांवरील मेट्रो स्थानके व खोली
शिवाजीनगर - १६ मीटर
सिव्हील कोर्ट - २८ मीटर
बुधवार पेठ- २४ मीटर
मंडई- १९ मीटर
स्वारगेट- २२ मीटर