दुर्गम भागातील नागरिकांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:16+5:302021-06-28T04:08:16+5:30
पुणे : पानशेत परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी सुमारे २५ ते ३० किलोमीटर लांब जावे लागते. छोटे काही आजार ...
पुणे : पानशेत परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी सुमारे २५ ते ३० किलोमीटर लांब जावे लागते. छोटे काही आजार झाले तर त्यासाठी ते अंगावरच काढतात. त्यामुळे या नागरिकांना घरच्या घरीच सर्दी, ताप, खोकला अशा आजारांवर औषध देण्याचा उपक्रम टेल्स ऑर्गनायझेशन आणि लोढा कुटुंबीयांनी राबविला.
पानशेतच्या पुढे डोंगरात काही वस्त्या आहेत. हिरवेवाडी, हिरवेवस्ती, पेरूदंड, पोळे या वस्त्यांवरील नागरिकांना या औषधांचा उपयोग होणार आहे. स्वानंद महिला संस्थेकडून ही मदत देण्यात आली. टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी ही औषधे वस्त्यांमध्ये जाऊन दिली. रंजना लोढा, स्वाती गेलडा, ज्योती भटेवरा यांनी यासाठी पुढाकार घेतला. लोढा कुटुंबीयामध्ये सर्वजण डॉक्टर आहेत. त्यांनी सर्दी, ताप, खोकला या आजारांसाठी टॅबलेट दिल्या. एका वस्तीसाठी एक बरणी आणि त्यामध्ये विविध आजारांवरील टॅबलेट आहे. कोणती टॅबलेट कशासाठी द्यायची ती माहिती देखील लिहून दिली आणि वस्तीमध्ये जो शिक्षित आहे, त्याच्याकडे औषधे देण्याचे काम दिले आहे. अतिशय साध्या आजारांसाठी ही औषधे असून, दोन-तीन दिवसांनी बरे वाटले नाही, तर मात्र डॉक्टरांकडेच जावे, असाही सल्ला लोढा कुटुंबीयांनी दिला आहे. रामभाऊ ढेबे, अंजू ढेबे हे औषधे देणार आहेत.