तळजाईच्या ‘त्या’ इमारतीत नागरिकांचा रहिवास
By admin | Published: November 5, 2014 05:26 AM2014-11-05T05:26:23+5:302014-11-05T05:26:23+5:30
तळजाई येथील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर परिसरातील अनधिकृत इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
पुणे : तळजाई येथील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर परिसरातील अनधिकृत इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १४ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्ट्रक्टरल इंजिनिअरच्या पाहणीत आढळून आले होते. त्या इमारतींच्या मालकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे, अन्यथा इमारती मोकळ््या करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, इमारतीच्या मालकांनी नोटीसला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या असून, जीव मुठीत घेऊन या इमारतीत नागरिक रहिवास करीत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या हद्दीत सप्टेंबर २०१२ मध्ये तळजाई येथे चार मजली इमारत कोसळून १२ जणांचा जीव गेला होता. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने तळजाई, आंबेगाव पठार व धनकवडी परिसरातील अनधिकृत बांधकामांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम स्ट्रक्चरल इंजिनिअर धैर्यशील खैरे पाटील यांच्या संस्थेला दिले होते. त्या वेळी खैर पाटील यांच्यासह तज्ज्ञांच्या समितीने महापालिकेच्या सहकार्याने इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी २३ इमारती धोकादायक आढळून आल्या होत्या. यात १४ इमारती अतिधोकादायक असून, त्यानुसार पालिकेला प्राथमिक अहवाल डिसेंबर २०१२पर्यंत सादर करण्यात आला.
दरम्यान, बांधकाम निरीक्षकांनी धोकादायक बांधकामाच्या मालकांना नोटीस दिल्या होत्या. महापालिकेकडे स्ट्रक्चरल इंजिनिअरची यंत्रणा नसल्याने संबंधितांनी खासगी संस्थेकडून स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे. अन्यथा धोकादायक इमारतीमध्ये रहिवास न करता, त्या मोकळ््या कराव्यात, अशी नोटीस बजावण्याचे सोपस्कर अधिकाऱ्यांनी केले. मात्र, अवघ्या तीन इमारतीच्या मालकांनीच स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल सादर केला आहे. उर्वरित इमारतींच्या मालकांनी नोटीसला उत्तरही दिलेले नाही. प्रत्यक्षात त्या धोकादायक इमारतींमध्ये मालक राहत नसून, भाडेकरी राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांना संबंधित इमारती धोकादायक असल्याचा कोणताही पत्ता नाही. महापालिका अधिकाऱ्यांनी त्या इमारतींना नोटिसांचे सोपस्कर पूर्ण करून पुढील कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले आहे. ०