पोलिसांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:33+5:302021-09-14T04:15:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे गर्दीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पादचारी मार्ग टप्प्याटप्याने बंद करावे लागले होते. पोलिसांकडून होत असलेली जनजागृती, गर्दी टाळण्यासाठी केले जाणारे आवाहन यामुळे आता शहराच्या मध्यवस्तीतील गर्दीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
शिवाजी रोडवरील लाल महाल चौक, हुतात्मा चौक, बेलबाग चौक आणि दत्तमंदिर चौक येथे गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने पादचारी मार्ग बंद करून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
डॉ. शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सुनील माने यांच्यासह प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्य वस्तीतील पेठांमध्ये पायी फिरून सुरक्षा व गर्दीचा आढावा घेतला.
गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर काेरोनाचे संकट आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही आहे. त्यामुळे राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार केली आहे. गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शनासाठी घराबाहेर पडून गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
* प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्हींच्या माध्यमातून गर्दीवर नजर ठेवण्यात येत आहे.
* दर १५ मिनिटांनी गर्दीचा घेतला जातो आढावा
* ध्वनिक्षेपकावरून गर्दी न करण्याचे केले जाते आवाहन
* प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त