कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:28+5:302021-04-18T04:09:28+5:30
कोरेगाव भीमा: सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नागरिकांना उपचार व बेड मिळणे देखील कठीण होत चालले आहे. ...
कोरेगाव भीमा: सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नागरिकांना उपचार व बेड मिळणे देखील कठीण होत चालले आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींसह नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नुकतेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोरेगाव भीमा येथे भेट देत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती घेत पाहणी केली, सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, प्रदीप काशीद यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गावातील कोरोना बधितांच्या बाबतची माहिती घेत गावामध्ये फेरफटका मारून गावातील परिस्थितीचा आढावा घेतला असून यावेळी प्रशासनास नियम न पाळणारांविरोधात कारवाई वाढवा, दुकाने सील करा, गावामध्ये वेळोवेळी फवारणी करून ग्रामस्थांना दवंडीद्वारे माहिती द्या असे आवाहन केले. तसेच सर्व प्रार्थनागृह व बाजार बंद करण्याचे व सणसवाडी मजूर अड्यावर सोशल डिस्टन्सचे पालन होते की नाही कंपनीने कामगारांसाठी कंपनीमध्ये राहायची व्यवस्था किंवा कामगारांना ने-आण करण्यासाठी बस व्यवस्था करायला सांगा, दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा, मेन रोड चालू बाकी रोड बंद करा आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा अशा सूचना नुकत्याच प्रशासनास केल्या असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच कोरेगाव-भीमा ग्रामपंचायत यांनी सदर सूचनांची अंमलबजावणी करण्यास देखील लगेचच सुरुवात केली आहे.
१७ कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा येथे भेट देऊन सूचना करताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख.