सततच्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:12 AM2021-03-01T04:12:45+5:302021-03-01T04:12:45+5:30
भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत ...
भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत असून याकडे पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. काहीच कारवाई होत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, वाहतूककोंडीवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भिगवणजवळील २० च्यावर वाड्यावस्त्या आणि तीन तालुक्यातील नागरिक खरेदीच्या निमित्ताने भिगवण बाजारपेठेत येत असतात. तर भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मासे खरेदीसाठी अनेक तालुक्यातील वाहने भिगवण बाजारात येत असतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून भिगवण शहराला वाहतूककोंडीच्या समस्येने बेजार केले आहे. एक किमी अंतराचा प्रवास करावयाचा म्हटले तरी कमीत कमी अर्धा तास वेळ लागत असल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील व्यापारी आपला माल रस्त्यावर ठेवत आहे. यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढच सुरू असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी बांधकामे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यांना बोळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याकडे ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.
आंबेडकर चौक ते प्रदीप मेडिकल, वांझखडे हॉटेल ते पुणे-सोलापूर सर्विस रोड, संगम वाइन्स ,जोती मिसळ आणि नवी बाजारपेठ अशी नेहमी वाहतूककोंडी असणाऱ्या जागा असून याची माहिती पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे या वाहतूककोंंडीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अतिक्रमणांमुळे आधीच रस्ते व्यापलेले त्यातच अवैध पार्किंगमुळे त्यात आणखी भर पडत आहे. रस्त्यावरून चालणेदेखील नागरिकांना अशक्य होत आहे. काही दिवसांपूर्वी भिगवण शहरात सम-विषमतारखेप्रमाणे पार्किंग करण्याची योजना जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचे घोडं कुठं आडलं आहे हे मात्र, समजत नाही. तर दुसरीकडे पुणे-सोलापूर महामार्गावरच व्यावसायिकांची स्पर्धा सुरू असते. हे सर्वांनाच माहित आहे. पण तरीही ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.