अर्धवट चालू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:12+5:302021-04-05T04:10:12+5:30
आव्हाळवाडी : पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूरपर्यंत करण्यात येत असलेल्या रस्तारुंदीकरणाच्या कामाबाबत व दिरंगाईबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली ...
आव्हाळवाडी :
पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूरपर्यंत करण्यात येत असलेल्या रस्तारुंदीकरणाच्या कामाबाबत व दिरंगाईबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी अवस्था झाली आहे. रस्त्यारुंदीकरणामुळे समस्या सुटण्याऐवजी समस्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरु आहे. हायब्रीड ॲन्युइटी अंतर्गत वाघोली (ता. हवेली) येथे करण्यात येत असलेल्या पुणे-नगर महामार्गाच्या कामाबद्दल नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच शनिवारी (दि. १३ मार्च) रोजी सकाळी वाघोलीमध्ये रस्त्याच्या मधोमध युटीलिटी क्रॉसिंग पाईप टाकण्यासाठी खोदलेला रस्त्यामध्ये वाहने अडकून पडल्याने सुमारे चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने टाकण्यात आलेली खडी वाहनधारकांना धोकादायक ठरत असून यामध्ये अनेक वाहने अडकून पडत आहे. सलग काम न करता एका ठिकाणी अर्धवट काम करायचे त्यानंतर पुन्हा दुसरीकडे करायचे या प्रकारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा अनेक ठिकाणी उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबधित अधिकारी यांना
कामाबाबत विचारल्यास कामाची पाहणी करून ठेकेदाराला सूचना देण्यात येतील असे एकच उत्तर ऐकायला मिळत आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना अजून किती दिवस काम चालणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रुंदीकरणामुळे समस्याऐवजी समस्यांत भर पडत आहे. ठीक-ठिकाणी अर्धवट सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारकांसह महामार्गालगत असणाऱ्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे- नगर मागामार्गावर रुंदीकरणाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून सलग काम न करता ठीक-ठिकाणी अर्धवट काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना धोका पत्करावा लागत आहे. १३ मीटरच्या बाहेर विद्युत केबल टाकणे गरजेचे आहे. परंतु १३ मिटरच्या आतच केबल टाकण्यात आला आहे. भविष्यात केबलमध्ये काही दोष झाल्यास संपूर्ण रस्ता खोदावा लागणार आहे. आहे.
महामार्ग ही खासगी मालमत्ता असल्यासारखी विविध खासगी कंपन्या वाटेल तेव्हा महामार्ग खोदून केबल टाकतात. त्यामुळे महामार्गाची दुरवस्था होत असून संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची साशंकता निर्माण होत आहे. - रोहित शिंदे (नागरिक, वाघोली)
पुणे-नगर रोडवर वाघोली येथे चालू असलेले रस्तारुंदीकरणाचे काम
2 Attachments