आठ दिवस लॉकडाऊनमुळे नीरा बाजारात नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:27+5:302021-05-18T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नीरेत उद्या मंगळवारपासून जनता कर्फ्यू पाळण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नीरेत उद्या मंगळवारपासून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी कोरोना नियमावली पायदळी तुडवत बाजारात गर्दी केली. पोलिसांचीही गर्दी पांगवताना दमछाक झाली. यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.
नीरा शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मंगळवार (दि. १८) ते बुधवार (दि. २६) सकाळपर्यंत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. या आठ दिवसांत सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यामुळे आठ दिवस लागणाऱ्या सामानाच्या खरेदीसाठी वीकेंड लॉकडाऊननंतर एक दिवस लोकांना नियम पाळून दुकाने उघडण्यात आली होती. पण, सोमवारी नीरा बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. नीरा शहारा बरोबरच आजूबाजूच्या गावातून शेकडोंच्या संख्येने लोक किराणा व भाजीपाला खरेदीसाठी आले होते. त्यामूळे मुख्य बाजाराला जत्रेचे रूप प्राप्त झाले होते. पोलिसांनी ही गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अकरा वाजेपर्यंत गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे अकरानंतर पोलिसांनी सक्तीने दुकाने बंद करायला लावली.
निरेतील भाजी बाजारातही आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. लोकांनी आठ दिवसांसाठी लागणारा भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी अरे आठ दिवस बाजार पेठ बंद ठेवायची आहे. आठ वर्षे बंद ठेवणार असल्यासारखे खरेदीला काय पाळताय' असे म्हणत त्यांनी लोकांसमोर अक्षरशः हात जोडले. आता या गर्दीने पुढील काळात कोरोना वाढतोय की काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर लोकांना संयमाने वागण्याचे व कोरोनापासून स्वतःला व कुटुंबाला वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
सोमवारी निरेतील मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने पोलिसांनी बंद करण्यास भाग पाडले. बारा वाजेपर्यंत सर्वत्र शुकशुकाट झाला होता. पण अहिल्यादेवी होळकर चौकातील एका कापड व्यावसायिकाने साडेबारानंतरही ग्राहकांना दुकानात घेऊन दुकानाच्या शटर कुलूप बंद केले. याची माहिती नीरा पोलिसांना कळताच, नीरा पोलिसांनी आपत्तीव्यवस्थापन समितीचे सचिव तथा तलाठी बजरंग सोनवले, ग्रामसेवक मनोज डेरे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल अप्पा लकडे यांच्या समक्ष संबंधित दुकानाचे शटर उघडण्यास भाग पाडले. दुकानदारास कापड विक्री करताना रंगेहाथ पकडले. यानंतर पोलिसांनी या दुकानदारला ताब्यात घेत त्याच्यावर १८८ नुसार कारवाई केली.
फोटोओळ : १)मंगळवारपासून निरेत होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर निरेत खरेदीसाठी लोकांची झुंबड.
२)लॉकडाऊनचे नियम मोडून कापड विक्री करताना रंगेहाथ पकडल्यानंतर कारवाई करताना आपत्तीव्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह नीरा पोलीस.