नागरिकांना भासतेय नोटांची चणचण
By admin | Published: May 8, 2017 03:15 AM2017-05-08T03:15:47+5:302017-05-08T03:15:47+5:30
नोटाबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाइन व्यवहाराला चालना देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनासह काही राजकीय पक्षांनीही घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाइन व्यवहाराला चालना देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनासह काही राजकीय पक्षांनीही घेतला होता. मात्र,‘एटीएम’मधून पैसे काढण्याची मर्यादा उठविल्यानंतर शहरातील एटीएममधून हवी तेवढी रक्कम काढून नागरिकांकडून रोखीने व्यवहार केले जात आहेत. परंतु, शहरातील बहुतेक ‘एटीएम’मध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा नोटांची चणचण जाणवू लागली आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर नागरिकांनी रांगा लावून जुन्या नोटा बँकेत जमा केल्या. तसेच केवळ दोन हजाराची एक नोट मिळवण्यासाठी एटीएमसमोर लांबच लांब रांगा लावल्या. नोटाबंदीचा निर्णय घेऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक एटीएममध्ये रक्कम नसल्याचे दिसून येत आहे. पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
एटीएममधून तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क आकारले जाते. त्यामुळे नागरिक एटीएममधून एकदाच अधिकाधिक रक्कम काढून घेतात. परिणामी एटीएममधील रक्कम लवकर संपते. त्यातच एटीएममधून वेळेवर पैसे मिळत नसल्याने काही व्यापारी बँकांमध्ये रक्कम जमा न करता दुकानात किंवा घरीच ठेवतात. त्यामुळे बँकांकडेही हव्या तेवढ्या प्रमाणात रोख रक्कम जमा होत नाही. शहरातील सर्वच एटीएममध्ये खडखडाट नसला तरी ज्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध आहेत, त्यात केवळ दोन हजार रुपयांच्याच नोटा आहेत. खूप कमी एटीएममध्ये नागरिकांना ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा मिळत आहेत.