कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आता दंड ऑनलाइन भरता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 09:51 PM2021-06-26T21:51:48+5:302021-06-26T21:52:09+5:30
आजपर्यंत ही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात येत होती, आता ही दंडाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने खुली ठेवणे, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न ठेवणारे दुकानदार अशा माध्यमातून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. परंतु, आजपर्यंत ही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात येत होती, आता ही दंडाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासनाच्या देखरेखीखाली एका खासगी बँकेत दंड आकारणीसाठी खाते उघडण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार ही सुविधा पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसात ऑनलाईन माध्यमातून 2400 रूपयांचा दंड जमा झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून नियम मोडणाऱ्या नागरिकांना आता दंडाची रक्कम ऑनलाईनही भरता येणार आहे. सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा यांना त्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल फोन, क्युआर कोड, क्यु आर कोड फ्लेक्सचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन दंड स्वीकारण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनकडील डे बुक व सर्व वाहतूक शाखांकडील ड्युटी वाटप करणारे पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यापुढील काळात जे नागरिक कोरोनाचे नियम मोडतील ते दंडाची रक्कम पुणे शहर पोलिसांना क्यू आर कोडद्वारे भरू शकतील. आपल्या मोबाईलमधील कोणत्याही यूपीआय अँपद्वारे क्यूआर कोड स्कँन करा आणि दंड भरा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.