नागरिकांना दंड ऑनलाइन भरता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:12+5:302021-06-27T04:08:12+5:30
पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने खुली ठेवणे, दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न ...
पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने खुली ठेवणे, दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवणारे दुकानदार अशा माध्यमातून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, आजपर्यंत ही रक्कम रोख स्वरूपात घेण्यात येत होती, आता ही दंडाची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत ऑनलाईन माध्यमातून २४०० रुपयांचा दंड जमा झाला आहे.
सहायक पोलीस आयुक्त प्रशासनाच्या देखरेखीखाली एका खासगी बँकेत दंड आकारणीसाठी वेगळे खाते उघडण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ही संकल्पना आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार ही सुविधा सुरू केली आहे. सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा यांना त्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल फोन, क्युआर कोड, क्युआर कोड फ्लेक्सचा पुरवठा केला आहे. तसेच ऑनलाईन दंड स्वीकारण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनकडील डे बुक व सर्व वाहतूक शाखांकडील ड्युटी वाटप करणारे पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण दिले आहे. यापुढील काळात जे नागरिक कोरोनाचे नियम मोडतील ते दंडाची रक्कम पुणे शहर पोलिसांना क्यूआर कोडद्वारे भरू शकतील. आपल्या मोबाईलमधील कोणत्याही यूपीआय ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करा आणि दंड भरा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून केले आहे.
------------------------------------------------------------