शहरामध्ये १०२८ कि. मी. पावसाळी गटारे बांधणार
By admin | Published: May 22, 2017 06:46 AM2017-05-22T06:46:39+5:302017-05-22T06:46:39+5:30
गेल्या काही वर्षांत शहरातील पावसाचे प्रमाण वाढले असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे झाली आहेत. शहरात मुसळधार पाऊस झाल्यास अनेक रस्त्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही वर्षांत शहरातील पावसाचे प्रमाण वाढले असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे झाली आहेत. शहरात मुसळधार पाऊस झाल्यास अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येते. या पार्श्वभूमीवर मलनि:सारण विभागाच्या वतीने शहरातील सुमारे १ हजार २८ किलो मीटर रस्त्यालगतची पावसाळी गटारे बांधण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ६४७.९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
शहरात रस्त्यांच्या कडेने पावसाळी गटारे जवळजवळ अस्तित्वात नसल्यासारखीच आहेत. यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येते व पाणी साठल्यामुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडून पाणी साठल्याने नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवणे धोक्याचे होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत पावसाळ्यात अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
याशिवाय वाढत्या शहरीकरणामुळे अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून हे नाले बुजविण्यात आले आहेत. यामुळे हे नाले पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता अपुरे पडत आहेत. यामुळे महापालिकेच्या मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात नाल्याचे चॅनलायझेशन करण्याचे व रिटेनिंग वॉल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शहराचा स्टॉर्म वॉटर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये क्रॉस ड्रेनेज वर्क्स, रस्त्यालगतची पावसाळी गटारे बांधणे, नाला चॅनलायझेशन बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही प्रमाणात कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. याच प्लॅनचा एक भाग म्हणून रस्त्यांच्या कडेने भूमिगत ड्रेनेजचे जाळे तयार करण्यात येणार आहे.