बारामती शहर झाले भगवेमय
By Admin | Published: September 29, 2016 05:56 AM2016-09-29T05:56:42+5:302016-09-29T05:56:42+5:30
गुरुवारी शहरात होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी झाली असून, या मोर्चासाठी जवळपास ५ लाखांहून अधिक बांधव उपस्थित राहणार आहेत. या संख्येमध्ये वाढदेखील होईल, असे
बारामती : गुरुवारी शहरात होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी झाली असून, या मोर्चासाठी जवळपास ५ लाखांहून अधिक बांधव उपस्थित राहणार आहेत. या संख्येमध्ये वाढदेखील होईल, असे आयोजकांनी सांगितले. सकाळी ११ वाजता मूक मोर्चा निघाल्यानंतर नियोजित मार्गाने मिशन हायस्कूलच्या पटांगणात साधारणत: २ तासांत पोहोचेल. त्या ठिकाणी ५ महाविद्यालयीन मुली निवेदनाचे वाचन करणार आहेत. याच मुली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. शहरात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषवाक्य असलेल्या कमानी सजल्या आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्यादेखील याच घोषवाक्याने रंगल्या आहेत. आज भगवा झेंडा खरेदीसाठी तरुणांसह महिलांची देखील तीन हत्ती चौक, भिगवण रोड येथे गर्दी झाली होती.
मोर्चा आयोजकांनी दुकाने खुली ठेवण्याचे आवाहन केले असले, तरी मोर्चातील गर्दीला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर गुरुवार आठवडे बाजारदेखील बंद राहणार आहे, असे भाजीपाला विक्रेता असोसिएशनने सांगितले.
मोर्चासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जवळपास ७५० अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी आहेत. त्याचबरोबर राज्य राखीव दलाची तुकडीदेखील मागविण्यात आली आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले.
आजपासूनच कसबा शिवाजी उद्यानपासून ते शहरातील
चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी...
खासगी शाळा, महाविद्यालयांना गर्दीमुळे मुलांना येता येणार नाही. त्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. मोर्चात येणाऱ्यांसाठी वाहतूकव्यवस्था देखील करण्यात आली आहे. वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या वाहनांना बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. तसेच, हातगाडी, पथारी व्यावसायिकांना पोलिसांनी बंदी घातली आहे.
मोर्चाला अनेकांचा पाठिंबा....
या मोर्चाला बारामतीतील विविध समाज संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चासाठी बारामती शहर व तालुक्यातून विविध समाज व संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र तहसीलदार हनुमंत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहेत. यामध्ये धनगर समाज, बारामती वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट, वीरशैव लिंगायत युवक संघटना, दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, पणदरे आदींचा समावेश आहे.