पोलिसांत तक्रार करणार शहर काँग्रेस : बदनामीच्या फ्लेक्सची दखल; विश्वजित कदमांना पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:51 AM2017-09-05T01:51:00+5:302017-09-05T01:51:18+5:30
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले.
पुणे : प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बदनामीचे बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले. संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करणार असल्याची माहिती देण्यात आली. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या शहर शाखेची पहिली पसंती कदम हेच आहेत, असेही या वेळी ठासून सांगण्यात आले.
कदम यांच्यासंदर्भात शहरात काही ठिकाणी तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार अशी टीका करणारे फलक शनिवारी पुण्यात लावण्यात आले होते. त्याबाबत खुलासा करताना पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, की पक्षाशी काहीही संबंध नसलेल्या लोकांनी केलेला हा उद्योग आहे. विश्वजित यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठीच सर्व आघाड्यांचे प्रमुख एकत्र आले आहेत. असे बदनामी करणारे फलक लावणाºयांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी पक्षाची मागणी आहे. महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी लोकसभेच्या सन २०१९ मधील निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काही जणांनी धडपड सुरू आहे. मात्र असे करून त्यांचे काहीही होणार नाही. गल्लीतील निवडणूक जिंकता येत नाही, कार्यकर्त्यांना निवडून आणता येत नाही व स्वप्नं मात्र खासदारकीची पा्हली जातात. उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, मात्र आमची पहिली पसंती विश्वजित कदमच आहेत, असे शिंदे म्हणाले. या वेळी आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख व कदम यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॅनर कोणी लावले त्यांचे स्पष्टपणे नाव का घेत नाही, असे विचारले असता बागवे यांनी काही लोक असंतुष्ट असतातच, त्यांना भाजपावाल्यांकडून फूस लावली जात आहे, असा आरोप केला. हिंमत असली असती तर त्यांनी नाव जाहीर केले असते, मग आम्हीही नाव घेऊन बोललो असतो, बांगड्या भरलेल्यांची दखल घ्यायचे कारण नाही, असे शिंदे म्हणाले.