शहर काँग्रेस नेतृत्वहीन
By admin | Published: February 12, 2015 02:31 AM2015-02-12T02:31:15+5:302015-02-12T02:31:15+5:30
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये गटातटाच्या राजकारणाने दुफळी निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवरून कोणीही लक्ष देत नाही
संजय माने, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये गटातटाच्या राजकारणाने दुफळी निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवरून कोणीही लक्ष देत नाही, पक्ष संघटनाच्यादृष्टीने नेतेमंडळी, पक्षश्रेष्ठींपैकी कोणीही वेळ देण्यास तयार नाही. तसेच स्वहिताला प्राधान्य देणाऱ्या आणि कचखाऊ वृतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संधी असूनही नेतृत्व करण्याची धमक दाखवली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था आणि पक्षाची बिकट अवस्था झाली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्ष म्हणून कार्यरत आहे. तर काँग्रेसकडे विरोधीपक्षनेतेपद आहे. महापालिकेत काँग्रेसचा प्रभाव दिसून येत नाही. काँग्रेसचे संख्याबळ १४ आहे. परंतू त्यातील काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला धार्जिणी अशी भूमिका घेतात. त्यामुळे काँग्रेसची एकजूट दिसून येत नाही. १९८६ ते ९२ या काळात महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. दिवंगत नेते प्रा.रामकृष्ण मोरे यांचे २००४ मध्ये निधन झाल्यानंतर शहर काँग्रेस नेतृत्वाला पोरकी झाली. त्यानंतर कोणीही नेत्यांनी नेतृत्वाबद्दल गांभीर्याने विचार केला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोकळे रान मिळाले. त्यांच्या स्थानिक पातळीवरील मनमानी कारभारावर पक्षश्रेष्ठींचे नियंत्रण राहिले नाही. पक्षश्रेष्ठींपैकी कोणीही नेतृत्वासाठी पुढाकार घेतला नाही, हे एक कारण असले तरी शहर पातळीवर नेतृत्व उदयास येण्यास संधी असताना, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या स्वहिताला प्राधान्य या धोरणामुळे आणि कचखाऊ वृत्तीमुळे नेतृत्व विकसित झाले नाही. नेतृत्वाचा अभाव निर्माण होणे हे खऱ्या अर्थाने स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अपयश आहे.