निवडणुकीत शहराध्यक्षा २४ तास ‘आॅन कॉल’
By admin | Published: February 16, 2017 03:29 AM2017-02-16T03:29:48+5:302017-02-16T03:29:48+5:30
सकाळी नव्हे पहाटेच ५.३० वाजता फोन वाजला तो अजित पवार यांच्या ‘रोड शो’साठी परवानगी मिळण्यास अडचण येत असल्याचे कार्यकर्त्यांने सांगितले.
सुषमा नेहरकर- शिंदे / पुणे
सकाळी नव्हे पहाटेच ५.३० वाजता फोन वाजला तो अजित पवार यांच्या ‘रोड शो’साठी परवानगी मिळण्यास अडचण येत असल्याचे कार्यकर्त्यांने सांगितले. या फोनमुळे झोपच उडाली अन् डोळे चोळतच उठावे लागले. सकाळचा दिनक्रम उरकत... चहा-नाष्टा घेतानाच एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला फोन करून रोड शोसाठी कोणत्याही परिस्थितीत आजच परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या...जाहिरातींचे मॅटर तयार झाले का.. शहरात सर्व ठिकाणी होर्डिंग लागले का.. कार्यकर्त्यांना सांगा कामाला लागा....सोशल मीडियावर आज कोणत्या पोस्ट टाकायच्या... फोन सुरूच होते... हे सुरू असतानाच कामवाल्या बाईला दुपारच्या जेवणासाठी काय करायचे.. रात्रीसाठी काय बनविणार हे सांगत होत्या... महापालिका निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांचा रात्री दोन-अडीच वाजता संपणारा दिवस पहाटे ५ वाजताच सुरू होतोय...
सध्या शहरात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीमध्ये खरा कस लागतो तो नेत्याचा अन् त्यातही शहराध्यक्षांचा. ‘लोकमत’च्या वतीने एक दिवस शहराध्यक्षांसोबत राहून त्यांचा दिवस कसा सुरू होतो, दिवसभर काय-काय व कोणत्या स्वरूपाची कामे करावी लागतात, प्रचारसभा, कार्यालयीन कामकाज आणि घरातील जबाबदाऱ्या कशी कसरत करावी लागते. यासाठी लोकमतच्या प्रतिनिधींनी एक दिवस शहराध्यक्षांसोबत राहून याचा अनुभव घेतला. राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या सोबत एक दिवस...
महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान होणार असून, युद्धपातळीवर प्रचार व इतर गोष्टींचे नियोजन सुरू आहे. चव्हाण सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडल्या व थेट पक्ष कार्यालय गाठले. कार्यालयामध्ये जाहिरातींचे नियोजन करण्यासाठी एजन्सी, आर्ट वर्क करणाऱ्या लोकांना बोलविले होते, तर पक्षाचे कार्यकर्ते वाट पाहतच होते. पुढील चार-पाच दिवस वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओवर जाहिराती करायच्या असल्याने प्लॅनिंग सुरू असतानाच मध्ये फोन सुरूच होते. काँगे्रससोबत संयुक्त बैठका घेण्याबाबत त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा, ताई, दुपारी वडारवाडीत प्रचाराचे नियोजन केलं... ताई, संगमवाडीत प्रचाराला येता ना?... दुपारी शरद पवार साहेबांच्या अल्पसंख्याक मीटिंगच्या प्लॅनिंगचे.. चहापाण्याच्या नाष्ट्याची सोय काय अनेक बारीकसारीक सूचना देत होत्या. त्यात रोड शोसाठी रिक्षा, ओपन जिप्सी मिळाली का यांची माहिती घेत होत्या. काही लोकांना कामाचे चेक देण्याचे कामही याच वेळी सुरू होते.
रेडिओ व सोशल मीडियावर व्हाईस एसएमएस करण्यासाठी शांत वातावरण म्हणून घर गाठले व दहा-पंधरा मिनिटांतच हे काम उरकून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वडारवाडी गाठली... येथे उमेदवारांना काही अडचणी होत्या, त्या ऐकून घेतल्या व फोनवर सूचना देत सांगितले... येथे चर्चा सुरू असतानाच संगमवाडी येथील उमेदवारांचा फोन सारखा वाजत होता... ताई, कार्यकर्ते थांबून आहेत कशा येता.... वडारवाडीतून थेट संगमवाडी गाठली... येथे दहा-पंधरा घरांमध्ये जाऊन मतदारांची भेट घेतली... हे सर्व उरकेपर्यंत तीन वाजले... घरी येऊन पोटात चार घास ढकलले... यासाठी स्वत: पराठे व जेवण गरम करून घेतलं... दहा मिनिटांतच साडी घालून शरद पवार यांच्या बैठकीसाठी घरातून बाहेरदेखील पडल्या. त्यानंतर ६ वाजता सिद्धी गार्डन येथील कार्यक्रम... रात्री ८ वाजता हडपसर येथील सभा आणि सभा उरकल्यानंतर रात्री अकरा वाजता जाहिरातींचे आर्ट वर्क अंतिम करण्यासाठी कोणत्या वृत्तपत्रात कोणत्या जाहिराती सोडायच्या प्लॅनिंग सुरू झाले... हे काम उरकून रात्री काही उमेदवारांच्या भेटी घेऊन पुढील तीन दिवसांचे नियोजन करत रात्रीचे तीन वाजले....