शहरात उन्हाळी शिबिरांचे फुटले पेव
By admin | Published: April 25, 2015 05:10 AM2015-04-25T05:10:12+5:302015-04-25T05:10:12+5:30
सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय- नाट्य, क्रीडा, कला अशा वेगवेगळ्या शिबिरांचे मोठे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत.
अमोल जायभाये, पिंपरी
सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय- नाट्य, क्रीडा, कला अशा वेगवेगळ्या शिबिरांचे मोठे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहेत. शहरात सध्या उन्हाळी शिबिरांचे पेव फुटले आहे. शिबिराचे आयोजन करण्यासाठी लागणारे प्रशिक्षक, प्रशिक्षित व्यक्तींची कमतरता असल्याने मुलांना कोणाकडे आणि कसे पाठवायचे, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे.
शहरामध्ये उन्हाळी शिबिरांचे फॅ ड मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. शाळेला सुट्टी लागताच शिबिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्याकडे कल वाढत आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा शहरातील वेगवेगळ्या भागात या उन्हाळी शिबिरांचा बोजवारा झाला आहे. त्यामध्ये काय शिकवले जाते आणि कोण शिकवते, याकडे लक्ष नसल्यामुळे मुलांचा विकास होण्याऐवजी नुकसानच होत आहे.
उन्हाळी शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी शिबिराला पाठवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळी शिबिराचा दर्जा घसरत चालला आहे. पाच ते सहा दिवसांच्या शिबिरातून काय सिद्ध होणार, हे माहितीच नसते. अनेक प्रकारची शिबिरे असतात. त्या शिबिरांचे शुल्क ही ३००० रुपयांपासून १०,०००पर्यंत व त्यापेक्षाही जास्त आहेत. त्यांचे आयोजन एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत करण्यात येते.
यामध्ये क्रीडा शिबिरे, डान्स शिबिरे, साहसी खेळ, कला, जंगल सफरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मात्र, शिबिरांचे आयोजन करताना त्यातील प्रशिक्षकांच्या गुणकौशल्यांची माहिती घेतली जात नाही. अनेक शिबिरे असे आहेत, की तेथे दोन-तीन तासच मुलांना शिकवले जाते. शिबिरातील प्रमुख शिक्षक राज्यस्तरावर किंवा इतर ठिकाणी झळकलेले असतात. त्यांच्या नावावर शिबिरे भरवली जातात. मात्र, प्रत्यक्षात मुलांना शिकवण्यासाठी दुसरेच प्रशिक्षक मानधनावर घेतलेले असतात. त्यामुळे मुलांना प्रशिक्षकांचा काहीच फायदा होत नाही वा त्यांच्याकडून काही शिकायलाही मिळत नाही.
शिबिराचे आयोजन करताना त्यांची व्यवस्थित माहिती घेतलेली नसते. त्यासाठी अधिकृत मार्गदर्शक नसतो. त्यामुळे मुलांना काहीच शिकायला मिळत नाही. शिबिरामध्ये मुलांवर संस्कार व्हायला हवेत. त्यामध्ये चांगल्या प्रशिक्षकांच्या हाताखाली त्या-त्या क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळाली पाहिजे. त्यामध्ये करिअर करण्यासाठी त्याचा काही उपयोग होणे गरजेचे असते.
शिबिरामध्ये विद्यार्थी किती असावेत, याची मर्यादा नसते. जितके प्रवेश मिळतील, त्या प्रमाणात विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष देता येत नाही वा त्यांना कोणत्याही गोष्टी शिकवता येत नाहीत. शिबिरामध्ये प्रवेश घेताना पालकांना मुलांनी काही ना काही तरी शिकावे. त्याचा फायदा अभ्यासात आणि कलागुणांमध्ये दिसावा, यासाठी ते पैसे भरत असतात. मात्र, त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.