शहरातील कचराप्रश्नी पालकमंत्र्यांची बैठक
By admin | Published: January 29, 2015 11:37 PM2015-01-29T23:37:49+5:302015-01-29T23:37:49+5:30
उरुळी देवाची येथील कचरा डेपो विरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेताना, २६ जानेवारीपर्यंत एकही गाडी न पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला
पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपो विरोधातील आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेताना, २६ जानेवारीपर्यंत एकही गाडी न पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर पालिकेने शहरात राबविलेल्या उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी, तसेच पुढील ९ महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम ग्रामस्थांपुढे सादर करण्यासाठी उद्या (शुक्रवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांनी ग्रामस्थ आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत ग्रामस्थ आणि महापालिकेची समन्वय समितीही स्थापन करण्यात येणार आहे.
कचरा डेपो बंद करण्याबाबत ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार ३१ डिसेंबरपासून डेपोत शहरातील कचरा टाकणे बंद झाले. त्यावर तोडगा काढण्यासाठी ८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ग्रामस्थांनी काही अटींवर देवाची उरुळी येथील कचरा डेपोमध्ये काही कचरा जिरविण्यास परवानगी दिली होती.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी २६ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते; मात्र पालिकेस शहरात निर्माण होणाऱ्या १६०० टन कचऱ्यामधील १२०० टन कचरा शहरातच जिरविणे शक्य झाल्याने अद्याप डेपोवर एकही गाडी पाठविण्यात आलेली नाही.
या बैठकीत गेल्या महिनाभरात पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. तसेच पालिकेकडून पुढील नऊ महिन्यांत केल्या जाणाऱ्या उपाययोजना, तसेच कालबद्ध कार्यक्रम मांडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)