शहरातील ३९४ जागा मोबाईल कंपन्यांकडे
By admin | Published: August 17, 2016 01:28 AM2016-08-17T01:28:49+5:302016-08-17T01:28:49+5:30
शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या तब्बल ३९४ जागा मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी देण्याचा विषय अखेर मंजूर करण्यात आला.
पुणे : शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या तब्बल ३९४ जागा मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी देण्याचा विषय अखेर मंजूर करण्यात आला. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतील मान्यता, त्यानंतर हाच प्रस्ताव निरस्त करण्याचा स्थायी समितीतील ठराव व पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी असा या प्रस्तावाचा ६ महिन्यांचा प्रवास अखेर संमतीमध्ये रूपांतरित झाला.
पालिकेची मालमत्ता, जागा कोणाला द्यायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे. त्या ठिकाणांचे व्यावसायिक दर अभ्यासण्यात येतात. या सर्व गोष्टी डावलून प्रशासनानेच या ३९४ जागांचा प्रस्ताव विशिष्ट मोबाईल कंपन्यांसाठी तयार केला होता. प्रस्ताव करून सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाने तो स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला.
माजी उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक संजय बालगुडे व अन्य काही सदस्यांनी या ठरावाला विरोध केला. त्यानंतरही स्थायी समितीत या ठरावाला बहुमताने सर्वपक्षीय मान्यता मिळाली. मार्च २०१६च्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आला. तिथे काही सदस्यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा विरोध नोंदवून घेत प्रस्तावाला सर्वपक्षीय मान्यता मिळाली. त्यानंतर बालगुडे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यामुळे महापौर प्रशांत जगताप यांनी या ठरावावर स्वाक्षरी करणे टाळले. तब्बल ६ महिने हा ठराव विनास्वाक्षरीच होता.
दरम्यानच्या काळात स्थायी समितीच्या जून २०१६ च्या बैठकीत हा प्रस्ताव निरस्त (रद्द) करावा असा ठराव बहुमताने मंजूर झाला. हाच ठराव अंतिम मान्यतेसाठी १० जुलै २०१६ च्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेत ३८५ क्रमांकाने आला. सभेत ठराव चर्चेला आलाच नाही. (प्रतिनिधी)