शहरात चार हजार रेमीडिसिव्हरचा साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:01+5:302021-04-08T04:12:01+5:30
पुणे : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमीडिसिव्हरचे चार हजार इंजेक्शन शहरात उपलब्ध आहेत. तसेच गुरुवारपर्यंत आणखी बारा हजार ...
पुणे : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमीडिसिव्हरचे चार हजार इंजेक्शन शहरात उपलब्ध आहेत. तसेच गुरुवारपर्यंत आणखी बारा हजार इंजेक्शन शहरात प्राप्त होतील. रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येसोबत गंभीर रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांकडून रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका रुग्णाला सहा इंजेक्शन देण्यात येतात. या इंजेक्शनची किंमत शासनाने कमी केली आहे. रुग्णालयांना या इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. काही रुग्णालयांमध्ये साठाचं नसल्याचे सांगून नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितले जात आहे. नागरिकांना हे इंजेक्शन मिळविताना अडचणी तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. इंजेक्शनसाठी हेल्पलाईनही सुरू केल्यानंतरही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की हे इंजेक्शन व अन्य औषधांची उपलब्धता वाढविण्यासाठी महापालिकेकडून अन्न व औषध प्रशासनासोबत सातत्याने संपर्क साधला जात आहे. सध्या शहरात ४ हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा असून गुरुवारी आणखी १२ हजार इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत.
--------
एका कंपनीकडून रेमीडिसिव्हरचे उत्पादन बंद
देशात रेमडिसिव्हीर उत्पादन करणार्या चार कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीने या इंजेक्शनचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. उर्वरीत तीनही कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढविण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात रेमडिसिव्हीरचा तुटवडा भासणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
--/
खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणार
इंजेक्शनच्या खरेदीसाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबविणार आहे. पालिकेकडून हे इंजेक्शन खरेदी केले जाणार असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.