लोणावळा शहरात पुन्हा पावसाने जोर धरला; सोमवारी २४ तासात १७२ मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:12 PM2021-07-20T14:12:13+5:302021-07-20T14:12:26+5:30
तीन दिवसात लोणावळा शहरात ४३० मिमी पाऊस झाला आहे
लोणावळा : लोणावळा शहरात सोमवारी २४ तासात १७२ मिमी इतका पाऊस झाला आहे. शनिवार पासून लोणावळा शहर व परिसरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. तीन दिवसात लोणावळा शहरात ४३० मिमी पाऊस झाला आहे. पवन मावळातील पवना धरण परिसरात सोमवारी ६० मिमी पाऊस झाला. धरणात आज अखेर ४०.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
मुंबई व कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम घाटमाथ्यावरील लोणावळा खंडाळा परिसरात पहायला मिळत आहे. काल दिवसभर शहरात झालेल्या पावसाने शहानी रोडसह विविध रस्त्यावर पाणी साचले होते. इंद्रायणी नदीपात्राची पाणी पातळी देखील वाढली होती. ग्रामीण भागात सदापुर येथे इंद्रायणी नदीवर नविन पुल बांधल्यानंतर पुर्वीचा लहान पुल न काढल्याने त्याला जलपर्णी आडकून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी परिसरात पसरले आहे.
लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यत १८४६ मिमी इतका पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरात आजपर्यत जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत १३६५ मिमी पाऊस झाला होता.