शहरातील पार्किंग महापालिका स्वत: चा चालविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 04:58 PM2019-11-12T16:58:46+5:302019-11-12T17:00:40+5:30
खासगी ठेकेदारांकडे १ कोटी ४७ लाखांची थकबाकी
सुषमा नेहरकर-शिंदे-
पुणे : शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मालकीची सुमारे २६ पार्किंग (वाहनतळ) आहेत. यापैकी सध्या सात पार्किंग महापालिकेच्या ताब्यात आहेत. तर अन्य पार्किंग खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देण्यात आली. परंतु ठेकेदारांचा मनमानी कारभार, नागरिकांना होणारा त्रास आणि खाजगी ठेकेदारांकडे असलेली कोट्यवधी रुपायंची धकबाकी यामुळे यापुढे शहरातील सर्व पार्किंग महापालिकेकडून स्वत:च चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भांतील प्रस्ताव मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने आयुक्ता यांना दिला आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी सार्वजनिक वाहनतळे उभारली आहेत. वाहनतळाच्या या सर्व जागा महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून खाजगी ठेकेदारांना चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. परंतु महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक व मनमानी पध्दतीने पार्किंग शुल्क वसुली करणे, हाताने लिहिलेल्या पावत्या देणे, ठेकेदारांने नियुक्त केलेल्या लोकांकडून गुंडागिरी करुन नागरिकांना त्रास देणे या सारखे अनेक प्रकार सातत्याने होत आहेत. याशिवाय महापालिकेने ठेके देताना निश्चित केलेली रक्कम देखील संबंधित ठेकेदारांकडून भरली जात नाही. यामुळे बहुतेक सर्व वाहनतळांची संबंधित ठेकेदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी नोटीसा देऊन देखील ठेकेदारांकडून थकबाकी दिली जात नाही. शहरातील बहुतेक सार्वजनिक वाहनतळ ज्या ठेकेदारांना देण्यात आले त्यांना स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचा पांठिबा असतो. यामुळे महापालिकेने नोटीसा देऊन देखील थकबाकी भरण्यासाठी पुढे येत नाहीत. याउलट नोटीसा दिल्यानंतर अधिकच मनमानी पध्दतीने ठेकेदारांकडून वाहनतळांचा कारभार सुरु होतो. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने यापुढे सर्व सार्वजनिक वाहनतळे स्वत: च चालविण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातील प्रस्ताव मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयुक्तांना दिला असल्याची माहिती विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी दिली.
-------------------
शहरात महापालिकेच्या मलकीचे एकूण वाहनतळे : २६
खाजगी ठेकेदारांच्या ताब्यात असलेली वाहनतळे : १८
महापालिकेच्या ताब्यात असलेली वाहनतळे : ७
महापालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेले वाहनतळ : १
वाहनतळांकडे असलेली धकबाकी : १ कोटी ४७ लाख ३१ हजार