शहरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना
By admin | Published: October 14, 2015 03:36 AM2015-10-14T03:36:45+5:302015-10-14T03:36:45+5:30
देवीला अभिषेक, श्रीसूक्त पठण, रुद्राभिषेक, महापूजा, नगारा वादनाचा निनाद, पवित्र मंत्रांच्या ध्वनीत पारंपरिक पद्धतीने
पुणे : देवीला अभिषेक, श्रीसूक्त पठण, रुद्राभिषेक, महापूजा, नगारा वादनाचा निनाद, पवित्र मंत्रांच्या ध्वनीत पारंपरिक पद्धतीने आज शहरात घटस्थापना करण्यात आली़ सार्वजनिक मंडळांनी मिरवणुका काढून देवीची प्रतिष्ठापना केली़
पावसाळा संपून शरद ऋतूच्या आगमनाची चाहुल देणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी गेल्या काही दिवसांपासून घरोघरी साफसफाई करून भाविकांनी तयारी केली होती़ आज सकाळपासून घराघरांत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली़ शहरातील मंदिरांमध्ये सकाळी घटस्थापना केली गेली़ चतु:शृंगी मंदिरात सकाळी ९ वाजता घटस्थापना करण्यात आली़ त्याअगोदर सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा करून देवीला महावस्त्र अर्पण करण्यात आले़ नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले़ घटस्थापनेनंतर महाआरती करण्यात आली़ या वेळी देवीला हिऱ्याची नथ अर्पण करण्यात आली़ सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती़
भवानीमाता मंदिरात सकाळी रुद्राभिषेक व महापूजा करण्यात आली़ तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन झाले़ त्यानंतर ११ वाजता घटस्थापना करण्यात आली़
सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात सकाळी ८ वाजता डी़ वाय़ पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे अध्यक्ष डॉ़ पी़ डी़ पाटील आणि उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली़ विनायक देवळणकर यांच्या नगारावादनाने नवरात्रोत्सवास सुरुवात झाली़ मयूर बँड पथकाने मधुर वादनाने महालक्ष्मीच्या चरणी सेवा केली़ पूजेचे पौरोहित्य मिलिंद राहुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले़ या वेळी अध्यक्ष राजकुमार अग्रवाल, मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, अॅड़ प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया उपस्थित होते़
पोलीस आयुक्त के़ के़ पाठक यांच्या हस्ते सायंकाळी विद्युत रोषणाई व गो ग्रीन थीम सजावटीचे उद्घाटन करण्यात आले़ शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात उपमहापौर आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली़ पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या देवीप्राणप्रतिष्ठापना स़ प़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ दिलीप सेठ यांच्या हस्ते झाली़ या वेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष अॅड़ गणेश सातपुते, उत्सवप्रमुख नरेश मित्तल, उद्योजक आनंद आगरवाल, अशोक अगरवाल, शुभांगी सातपुते, महेश महाले आदी उपस्थित होते़
शहरात ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका काढून
देवीची स्थापना करण्यात
आली़ अनेक ठिकाणी श्रीसूक्ताचे सामूहिक पठण आयोजित करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)