शहरात पावसाने उडवली दाणादाण, रस्त्यांवर गुडघाभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:39+5:302021-07-24T04:09:39+5:30
पुणे : पुणे शहर आणि उपनगरात शुक्रवारी पावसाने धुवाधार बॅटिंग केली. विशेषत: सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाचा ...
पुणे : पुणे शहर आणि उपनगरात शुक्रवारी पावसाने धुवाधार बॅटिंग केली. विशेषत: सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाचा जोर प्रचंड होता. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीचालकासह चारचाकी गाड्यांना कसरत करत पाण्यातून वाट काढावी लागत होती. गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने रस्त्यातच अनेकांच्या गाड्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करत गाड्या ढकलत न्याव्या लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेषत: शहरातील शिवाजीनगर, पाषाण आणि लोहगाव भागात सवार्धिक पावसाची नोंद झाली आहे. तर त्याखालोखाल सिंहगड रोड (खडकवासला परिसर), वारजे, कात्रज-आंबेगाव परिसरात पावसाची नोंद झाली आहे. तर सवार्त कमी कोथरूड परिसरात पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी अगदी सकाळपासून शहर आणि परिसरात धुवाधार पावसाला सुरूवात झाली. पावसाळी ड्रेनेजलाईन, नालेसफाईच्या स्वच्छतेचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत. अनेक भागात रस्त्यावर गुडघाभर साचलेल्या पाण्याला निचरा होण्यास अडचण आली. रस्त्यारस्त्यांवर पाण्याची डबकी साचली होती. त्यातून वाट काढत दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठी कसरत करावी लागली.
---
सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)
* शिवाजीनगर :- ७७.२ मि.मी.
* पाषाण :- ६३.४ मि.मी.
* लोहगाव :- ५७ मि.मी.
---
सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतचा पाऊस (मिमीमध्ये)
* सिंहगड रोड (खडकवासला परिसर) :- ५० मिमी
* कात्रज-आंबेगाव :- ४९ मिमी
* वारजे :- ५१.८ मिमी
* कोथरूड :- ३२ मिमी
---
रात्री ८.३० वाजेपर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)
* शिवाजीनगर :- ७८ मिमी
* लोहगाव :- ५९.६ मिमी