शहरात होणार ६९ कोटींचे पदपथ, प्रशासन, नगरसेवक दोघांचीही कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:59 AM2018-03-13T00:59:45+5:302018-03-13T00:59:45+5:30
येत्या वर्षभरामध्ये शहरात तब्बल ६९ कोटी रुपयांचे पदपथ विकसन म्हणजे आहे त्या पदपथांचे काम होणार आहे. २४ तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्वत्र टाकण्यात येणा-या जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्त्यांबरोबरच पदपथही फोडावे लागणार आहेत.
पुणे : येत्या वर्षभरामध्ये शहरात तब्बल ६९ कोटी रुपयांचे पदपथ विकसन म्हणजे आहे त्या पदपथांचे काम होणार आहे. २४ तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्वत्र टाकण्यात येणा-या जलवाहिन्यांच्या कामासाठी रस्त्यांबरोबरच पदपथही फोडावे लागणार आहेत. मात्र सिमेंटच्या रस्त्यांना मनाई व पदपथासाठी मात्र वारेमाप खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
शहरात साधारण ७०० ते ८०० किलोमीटर अंतराचे पदपथ आहेत. त्यांची रुंदी कमी-जास्त आहे तसेच प्रत्येक रस्त्याला पदपथ आहेच असे नाही. पदपथांची उंची रस्त्यांपेक्षा थोडी जास्त असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ते असतात. पायी चालणाºयांना सुरक्षित वाटावे यासाठी त्यांची निर्मिती केली जाते. हे पदपथ पूर्वी फरशा टाकून तयार केले जात असत. त्यानंतर त्यावर सिमेंटचे ब्लॉक बसवले जाऊ लागले. आता रंगीत पेवर ब्लॉक बसवले जातात. प्रभागातल्या पदपथांवर आहे त्या फरशा, किंवा जुने ब्लॉक काढून तिथे नवीन रंगीत आकर्षक ब्लॉक बसविणे ही प्रभाग विकासाची पहिली इयत्ता समजली जाते. नागरिकांची मागणी असो वा नसो, या कामांचे प्रस्ताव नगरसेवकांकडून तयार केले जातात व प्रशासनाला सादर होतात. २० लाखांपासून पुढचीच ही सर्व कामे आहेत. काही ठिकाणी ती ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची आहेत. पदपथाचे अंतर वाढले की खर्चही वाढतो.
नगरसेवकस्तरावर व आयुक्त स्तरावर अशा दोन्ही विभागांकडून पदपथ विकसनाची कामे सुचवली जातात. यावर्षीच्या अंदाजपत्रकात प्रशासनाने अशा कामांसाठी ३३ कोटी ४० लाख ९ हजार ५०० रुपयांची तरतूद केली आहे. नगरसेवकस्तरावर म्हणजे स यादीसाठी ही तरतूद ३७ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. दोन्ही मिळून ६८ कोटी ८५ लाख ९ हजार ५०० रुपयांची तरतूद पदपथ विकसन या एकट्या कामासाठी आहे. या तरतुदीला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली असल्याने आता ही तरतूद याच कामासाठी लॉक करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या कामांचे प्रस्ताव तयार केले जातील व निविदाही काढली जाईल.
>फोडाव्या लागणाºया पदपथांचे काम करणार नाही
पदपथांची कामे जास्त असतात हे बरोबर आहे. त्यासाठी दरवर्षीच इतकी तरतूद केली जाते व ती खर्चही होते. २४ तास पाणी योजनेसाठी रस्त्यांबरोबरच काही ठिकाणी पदपथही फोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी वेळ आली तर ती कामे केली जाणार नाहीत.
- राजेंद्र राऊत,
अधीक्षक अभियंता, पथविभाग
>जास्तीची तरतूद
चोवीस तास पाणी योजनेचे काम करायचे असल्याने सिमेंटच्या रस्त्यांसाठी तरतूद करण्याची आवश्यकताच नव्हती, मात्र तरीही प्रशासन व नगरसेवक मिळून तब्बल २५० कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. आता ती रक्कम वर्ग करून घेतली जाणार आहे, तसेच पदपथांची कामेही होणार आहेत. शहरातील पदपथांसाठी जी ६९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ती पदपथांचे नंदनवन करता येईल इतकी आहे. तीही आता वर्ग करून घेतली जाईल.
- चेतन तुपे,
विरोधी पक्षनेते, महापालिका