स्वखर्चाने उचलला शहरातील कचरा
By admin | Published: July 25, 2015 04:59 AM2015-07-25T04:59:12+5:302015-07-25T04:59:12+5:30
सार्वजनिक स्वच्छतेचा वसा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने आणि त्याच्या सहकार्ऱ्यांनी तीन दिवस बारामती शहराच्या विविध भागांतील
बारामती : सार्वजनिक स्वच्छतेचा वसा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने आणि त्याच्या सहकार्ऱ्यांनी तीन दिवस बारामती शहराच्या विविध भागांतील कचरा उचलून खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबविले. तीन दिवसांत जवळपास ६५ ट्रेलर कचरा उचलून विल्हेवाट लावली. या उपक्रमाचे बारामतीकरांनी कौतुक केले.
सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ, त्यांचे बंधू अभिजित धुमाळ यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्वखर्चातून जेसीबी यंत्रणा लावून हे अभियान राबविले. मागील वर्षी ‘लोकमत’ने ‘आता बास’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल धुमाळ बंधूंनी घेतली. शहरातील गल्लीबोळांतील न उचललेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होत. त्यामुळे एक वेगळा उपक्रम म्हणून त्यांनी शहरातील विविध ठिकाणचा कचरा उचलला. त्याचबरोबर रस्त्यामध्ये झालेला राडारोडा दूर केला. यंदाही माजी मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला.
कसबा भागातील लेंडीनाला, अण्णा भाऊ साठेनगर, श्रीरामनगर, पंचशीलनगर, जगतापमळा या भागातील मोठ्या प्रमाणात साठलेला कचरा उचलण्यात आला. त्यानंतर शहरातील व्हील कॉलनी, वसंतनगर, अवचट इस्टेट, तपोवन कॉलनी, माता रमाई भवनाचा परिसर, आमराई आदी भागांतील कचऱ्याचे ढीग उचलले. अवचट इस्टेटमध्ये नगरपालिकेने भूमिगत गटार योजना केली आहे. त्यामुळे रस्ता उकरला होता. या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण झाले होते. त्या रस्त्याचे मुरमीकरण व सपाटीकरण केल्याने वाहने चालविण्यासाठी सोयीस्कर झाले. या स्वच्छता अभियानाचे कौतुक बारामतीकरांनी केले. जवळपास ६० ते ६५ ट्रेलर कचऱ्याचे ढीग उचलण्यात आले.
या उपक्रमाला विविध पदांवर चांगल्या नोकरीला असलेल्या तरुणांनीदेखील सहकार्य केले. त्यामध्ये फत्तेसिंह गोंडगे, विनय शेलार, अभिजित पाटील, सूरज देशमाने, अक्षय जगताप, भरत काळे, बंटी शिवरकर, नितीन वाघमोडे, आकाश साळवे, अमोल नेवसे, वैभव अडसकर, मनीष काळे, करण देशमाने, सोमनाथ धर्माधिकारी, उद्योजक हेमंत हरनोेळ, नितीन चांदगुडे, प्रकाश शिंदे, हर्षद पवार, आदित्य हेंगणे, राजेंद्र खराडे, सुशील घाडगे, राजेंद्र लोणकर, शरद पवार, शेखर शिंदे, वैभव बोरसे यांनी मोलाचे सहकार्य केले. (प्रतिनिधी)