पुण्याच्या रस्त्यावरची ट्रॅफिक हटली ; हवेच्या प्रदूषणाची पातळीच घटली...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:30 PM2020-03-19T23:30:00+5:302020-03-19T23:30:07+5:30
कोरोनामुळे पुण्यात अघोषित जमावबंदी लागू
पुणे :कोरोनामुळे पुण्यात अघोषित जमावबंदी लागू केल्याने काही दिवसांपासून रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहने धावण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवेच्या प्रदूषण पातळीत 25 ते 30 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शहरातील हवेच्या प्रदूषणाची स्थिती ’समाधानकारक’ आहे.
शहरात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर या विषाणूवर नियंत्रित मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांसह शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश देऊन गर्दी टाळण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी कार्यालये, हॉटेल्स, चहाच्या टप-या देखील बंद करण्यात आल्या आहेत. या अघोषित जमावबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची संख्या देखील झपाट्याने कमी झाली असून,त्याच्या परिणास्वरूप गेल्या काही दिवसांमध्ये हवेतील प्रदूषण पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे . विशेष म्हणजे बुधवार (18 मार्च) च्या तुलनेत गुरूवारी (19 मार्च) शहरातील तुरळक वाहतुकीमुळे प्रदूषण पातळी ५१-१०० (समाधनकारक) पर्यंत कमी झाल्याचे दिसून आले आहे.
पाषाणची हवा सर्वात शुद्ध
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यामानकानुसार हवेतील अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण (पीएम २.५) प्रति घनमीटर ४० मायक्रो ग्रॅमपेक्षा कमी, तर सूक्ष्म धुलिकणांची (पीएम १०) पातळी ६० पेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. मात्र, शहरात शिवाजीनगर, लोहगाव, कात्रज आणि हडपसरच्या तुलनेत पाषाणची हवा शुद्ध आहे.
शिवाजीनगरला अधिक वाहतूक
शिवाजीनगर परिसरात सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण शहरातील इतर परिसरापेक्षा अधिक आहे. त्यानंतर भोसरी, हडपसर, लोहगावमध्ये सर्वाधिक प्रदूषित हवा दिसून येते. कारण त्या ठिकाणांवर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. वाहनांतील धूर, विद्युत उर्जेचा वाढता वापर आणि औद्योगिकीकरणामुळे हा परिणाम होत आहे. शिवाजीनगरमधील वाढती वाहतूक देखील प्रदूषणात वाढ करत आहे.
आरोग्यावरील दुष्परिणाम
मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिसूक्ष्म धूलिकण धोकादायक आहेत. ते श्वसनामार्फत फुफ्फुसांमध्ये जाऊन साठून राहत आहेत. सूक्ष्म कण हे हानीकारक घटकांनी बनलेले असतात. त्यामुळे ते रक्तात मिसळतात. परिणामी रक्तातील आॅक्सिजन नेण्याची क्षमता कमी होत जाते.
प्रदूषणाची कारणे
वाहनातून बाहेर पडणाºया धुरामध्ये 'नॅनो' आकाराचे काजळीसारखे कण असतात. या कणांनी अतिसूक्ष्म धूलिकण तयार होत असतात. हेच कण मानवाच्या आरोग्यास आणि पर्यावरणासाठी देखील घातक आहेत. वाहनांतील इंधनाचे ज्वलन, मोठ्या प्रमाणावर होणारे बांधकामे, कचरा जाळणे आदी प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत.
..............
कोरोनामुळे रस्त्यावर वाहनांची तुरळक गर्दी दिसत आहे. वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे हवेच्या प्रदूषण पातळीतही २५ ते ३० टक्क्याने घट झाली आहे. ११५ वरून प्रदूषणाची पातळी ७५ पर्यंत खाली आहे. - डॉ. जितेंद्र संगेवार, पुणे विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
...........................
शहरातील हवा प्रदूषणाचे वास्तव
हवेच्या दर्जाची दोन दिवसांची स्थिती
18 मार्च 19 मार्च
* शिवाजीनगर 140 79
*हडपसर 126 92
*पाषाण 61 43
* लोहगाव 110 80
*भोसरी 123 92
* आळंदी 106 79
*निगडी 93 69
----------------------------------------------------
शहरातील हवा प्रदूषणाची पातळी
०-५० चांगले
५१-१०० समाधानकारक
१०१-२०० मध्यम
(हृदयरोग, ज्येष्ठ, लहान मुले यांच्यासाठी धोका)
२०१-३०० धोकादायक
(सामान्य नागरिकांना देखील धोका)
३०१-४०० अतिधोकादायक