शहराचा पॉझिटिव्हिटी रेट झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:37+5:302021-04-17T04:11:37+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात स्वाब तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. गेल्या तीन आठवड्यांत शहरात ४ लाख २० हजार ५१७ स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. या काळात शहरातील पॉझिटिव्हिटी रेट २५.५८ टक्क्यांवरून २३.१७ टक्क्यांवर आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी काही प्रमाणात कमी झाला असून तो आणखी कमी करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात रुग्णवाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तपासण्या वाढविण्यात आल्या. या काळात जम्बो कोविड सेंटरसह अन्य कोविड सेंटर सुरू करण्यात आली. तसेच, खासगी रुग्णालयांमधील खाटाही ताब्यात घेण्यात आल्या. या काळात स्वाब तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ३५ टक्क्यांच्या घरात पोचले होते. हे प्रमाण कालांतराने कमी होत गेले. प्रशासनाने मागील तीन आठवड्यांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये शहरातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याचे दिसत आहे. हा दर आणखी कमी होत गेल्यास रुग्णसंख्याही घटत जाईल. त्यामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळू शकेल.
-----
जिल्ह्यातही मागील दोन आठवड्यात पॉझिटिव्ही रेट कमी झाला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान १ लाख ५० हजार ३६५ तपासण्या झाल्या. यातील ४१.२७ टक्के पॉझिटिव्हीटी रेट होता. तर, ८ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान १ लाख ९६ हजार ७७८ स्वॅब तपासण्या करण्यात आल्या. यातील पॉझिटिव्हीटी रेट ३१.३४ टक्के होता.
-----
शहरातील तपासण्या आणि पॉझिटिव्हीटी रेट
आठवडा। तपासण्या। पॉझिटिव्हीटी रेट
२५ मार्च ते ३१ मार्च - १ लाख १२ हजार ८७९। २२.१७
१ एप्रिल ते ७ एप्रिल। १ लाख ४० हजार ८२३। २५.५८
८ एप्रिल ते १४ एप्रिल। १ लाख ६६ हजार ८१५। २३.१७