शहरातील झोपडपट्ट्या असुरक्षित
By Admin | Published: May 13, 2016 12:58 AM2016-05-13T00:58:43+5:302016-05-13T00:58:43+5:30
पुण्यातील मंगळवार पेठेतील झोपडपट्टीला शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५० झोपड्या खाक झाल्याची घटना सोमवारी घडली
चिंचवड : पुण्यातील मंगळवार पेठेतील झोपडपट्टीला शॉर्टसक्रिटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५० झोपड्या खाक झाल्याची घटना सोमवारी घडली. झोपडपट्टीला लागलेल्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. कारण झोपडपट्टीतील आगीच्या ठिकाणी अग्निशामक बंब जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवायला मोठ्या प्रमाणात वेळ लागून, मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. अत्यंत दाटीवाटीने असलेल्या झोपडपट्टयांच्या ठिकाणी चारचाकी वाहन जाण्यासाठी जागा नसल्यामुळे या आगीवर अग्निशामक विभागाला लवकर नियंत्रण मिळविता आले नसल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले. दरम्यान, मंगळवार पेठेतील झोपडपट्टीप्रमाणेच पिंपरी-चिंचवमधील झोपडपट्टीतही अशीच परिस्थिती असून, या ठिकाणीही अशी परिस्थिती उद्भभवल्यास या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत सध्या २००२ च्या सर्वेक्षणानुसार ७१ झोपडपट्टया आहेत. यामध्ये शासनामार्फत घोषित केलेल्या ३७ व अघोषित ३४ झोपडपट्टया आहेत. या झोपडपट्टयांमध्ये महापालिकेच्या जागेवर ६, प्राधिकरणाच्या जागेवर ८, एमआयडीसी १६, सरकारी १६,खासगी २५ 6अशा ठिकाणी शहरातील झोपडपट्टीचा विस्तार आहे. दरम्यान महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागातर्फे जेएनएनयूआरएम व बीएसयूजी या योजनेअंतर्गत झोपडपट्टयांच्या ठिकाणी नवीन प्रकल्प राबविण्यात येत असले तरी, बहुतांश झोपडपट्टया आज मोठ्या प्रमाणात तेथे झालेली अत्यंत दाटीवाटी आणि अरुंद रस्त्यांमुळे असुरक्षित झाले असल्याचे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसले.
झोपडपट्टींच्या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर असून,या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारीच झोपडपट्टीतील रहिवाशांनी आपली घरे उभी केली आहेत. पावसाळी दिवसांत या ट्रान्सफॉर्मवरील लोखंडी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असते. असे असताना देखील येथील नागरिकांनी अंतरही न ठेवता दाटीवाटीने ट्रान्सफॉर्मरला लागूनच झोपडपट्टया थाटल्या आहेत. काही ठिकाणी विद्युत तारा लोंबकळलेल्या देखील आहेत. कदाचित या ठिकाणी शॉर्ट सक्रिट होऊन दुर्घटना उद्भभवल्यास या ठिकाणींही मदतकार्य पोहचविण्यास अडथळा होणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)