हॉटेलमालकांचे सरकारी कार्यालयांसमोर सविनय आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:51+5:302021-04-09T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या कारणावरून सरकारने घातलेल्या बंदीचा हॉटेल मालकांनी गुरूवारी सर्व सरकारी कार्यालयांसमोर निषेध केला. युनायटेड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या कारणावरून सरकारने घातलेल्या बंदीचा हॉटेल मालकांनी गुरूवारी सर्व सरकारी कार्यालयांसमोर निषेध केला. युनायटेड हॉस्पिटिलीटी संघटनेच्या वतीने शहरातील ६ कार्यालयांसमोर निषेध करण्यात आला. निषेधाचे फलक हातात घेऊन मालक शांतपणे सरकारी कार्यालयांसमोर उभे होते.
कौन्सिल हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच एक्साईज कार्यालयासमोर सकाळी ११ ते ४ यावेळात संघटनेचे सदस्य हातामध्ये निषेधाचे काळे फलक घेऊन उभे होते. लक्ष्मी रस्त्यावर व्यापारी संघटनेने पुकारलेल्या निषेध आंदोलनातही संघटनेचे सदस्य दर्शन रावल, समीर शेट्टी, संदीप नारंग, राहुल रामनाथ आंदोलनात सहभागी झाले होते.
उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले की, सरकारने केलेल्या हॉटेलबंदीला कसलाही शास्त्रीय आधार नाही. असे केल्याने कोरोनाची लाट थांबेल. याची खात्री कोणी देत नाही. काळजी घेतली पाहिजे हे १०० टक्के मान्य आहे, पण हा उपाय म्हणजे रोग परवडला औषध नको असे झाले आहे. नियम कडक करा, ते आम्ही पाळू, मात्र बंदी उठवा, अशी आमची मागणी आम्ही शांतपणे सरकारपर्यंत पोहोचवत आहोत.
फोटो : युनायटेड हॉस्पिटिलीटी संघटनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर हॉटेल बंदीचा सविनय निषेध करण्यात आला.