नागरिक घरात, पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:56+5:302021-04-04T04:11:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदीची अंमलबजावणी लागू करण्यात आली. ...

In the civilian house, on the police street | नागरिक घरात, पोलीस रस्त्यावर

नागरिक घरात, पोलीस रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदीची अंमलबजावणी लागू करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या चौकात नाकाबंदी करून पोलीस रस्त्यावर उतरले होते. संचारबंदीच्या घोषणेमुळे पुणेकरांनी अगोदरपासूनच काळजी घेऊन सायंकाळी ६ वाजण्याच्या आत घरी पोहचण्याची घाई शहरात सायंकाळी सर्वत्र दिसून येत होती. त्यामुळे उपनगरांत अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्या आदेशात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी पोलीस घेणार असून या गोष्टींकडे अधिक संवेदनशीलतेने पाहणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

शहरात सायंकाळी ६ वाजता संचारबंदी लागणार असल्याचे लक्षात घेऊन शहरातील व्यापारी, दुकानदार यांनी अगोदरच त्यादृष्टीने काळजी घेताना दिसून आले. सायंकाळी ६ वाजता बहुतांशी दुकाने बंद असल्याचे बाजारपेठांमध्ये फेरफटका मारल्यावर दिसून येत होते.

शहरातील महत्वाच्या चौकात पोलिसांनी सायंकाळी ६ वाजल्यापासून नाकाबंदी सुरु केली. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना थांबून त्यांची चौकशी केली जात होती. त्यांची नावे लिहून घेतली जात होती. त्याचवेळी पोलीस व्हॅनवरुन अनाऊंसमेंट केली जात होती. नरपतगिरी चौक, संत कबीर चौक, दारुवाला पुल, जंगली महाराज रोड तसेच टिळक चौक अशा महत्वाच्या चौकांमध्ये बॅरिकेड लावून नाकाबंदी केल्याचे दिसून येत होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ते ४ ठिकाणी अशा प्रकारे नाकाबंदी करण्यात आली आहे. पहिलाच दिवस असल्याने आज पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी वाहनचालकांना समजावून सांगण्यावर भर दिला होता.

पुणे रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून आली. एसटीला मात्र गर्दी दिसून आली नाही. नेहमी रात्रभर सुरु असणाऱ्या टपर्‍या, हातगाड्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या. परिसरातही लोकांची गर्दी कमी झाली होती. मात्र, त्याचवेळी कॅब, रिक्षा सुरु असल्याने बाहेरगावाहून येणार्‍यांना फारशी अडचण होताना दिसून आली नाही.

सायंकाळच्या वेळी नेहमी फिरायला येणार्‍यांच्या तरुणतरुणींची विशेषत: शनिवार- रविवार सायंकाळी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड ओसंडून वाहत असतो. मात्र, आज शनिवारी या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत होता. फक्त काही वाहने ये-जा करताना दिसत होती. त्यांनाही अडवून पोलीस चौकशी केल्यावरच पुढे सोडत होते.

आज शनिवारची सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी नेहमीपेक्षा कमी होती. जे वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडले होते. तेही सायंकाळी ६ च्या आज घरी जाण्यासाठी घाई करीत होते. एकाचवेळी असंख्य वाहने सिंहगड रोडवर आल्याने राजाराम पुलापासून पुढे सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते. अशीच परिस्थिती सोलापूर रोड, नगर रोड, गणेशखिंड रोडवर काही वेळ दिसून आली.

Web Title: In the civilian house, on the police street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.