हक्काचे ‘मामाचे गाव’ हरवले...

By Admin | Published: May 6, 2017 02:03 AM2017-05-06T02:03:03+5:302017-05-06T02:03:03+5:30

‘झुक्झुक् झुक्झुक् आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहू या... मामाच्या गावाला जाऊ या’ हे बालगीत

Claim of 'Mama's village' lost ... | हक्काचे ‘मामाचे गाव’ हरवले...

हक्काचे ‘मामाचे गाव’ हरवले...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
निमोणे :
‘झुक्झुक् झुक्झुक् आगिनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या...
मामाच्या गावाला जाऊ या’
हे बालगीत कमालीचे लोकप्रिय झाले होते, कारण खरोखर मुलांना हक्काचे मामाचे घर होते. पण, काळाच्या ओघात आता मात्र हे मामाचे घर हरवले असल्याचे दिसून येते.
मुलांना सुट्या लागल्या, की पहिली आठवण व्हायची ती मामाच्या गावाची... दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत जायची ती हक्काची जागा. पण, आजच्या तंत्रयुगात मात्र टीव्ही, मोबाईलमध्ये रमलेली बच्चेकंपनी मामाचा गाव विसरली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही.
पूर्वी सहामाही आणि वार्षिक परीक्षा संपत आल्या, की मुलांना मोठ्ठी सुटी लागायची. मग मामाच्या गावी जाण्याचे वेध लागायचे. त्या वेळी नात्यागोत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभाव होता. परस्परांत स्नेह आणि आपुलकी होती. तेव्हा मामाचा गाव हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. खूप लांब नाही जवळच्याच एखाद्या खेडेगावात मामाचे घर असे. या घरात मामा, मामी, आजी, आजोबा या जीव लावणाऱ्या नात्यांसह खेळण्या-बागडण्यासाठी मामाची मुले असत. या मुलांसोबत दिवसभर गोट्या, लगोर, चेंडू, सूरपारंब्या खेळणे, रानावनात भटकून रानमेव्याचा आस्वाद घेणे, विहिरी-तलावांमध्ये मनसोक्त डुंबणे, मामा-मामींना कामात मदत करणे असा भरगच्च कार्यक्रम असायचा. नव्या आधुनिक युगात हे सारे संदर्भ आता पुसल्यागत झाले आहेत.
सायंकाळी अंगणात सर्वांसह बसून इकडच्या-तिकडच्या गप्पा आणि नंतर चंद्राच्या शीतल चांदण्यात जेवणाची पंगत असे. सोबत आजीने दिवसभर जपून ठेवलेला खाऊ अमृताची गोडी देत असे. या वेळापत्रकात सुटी कधी संपते, हेही कळून येत नसे. सुटी संपल्यावर नवेकोरे कपडे घालून पुन्हा आपल्या घरी मोठ्या ऐटीत परतताना पुढील सुटीचाही वायदा होत असे.
आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांमुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याने जीवनशैलीही बदलली आहे. नात्यागोत्यांतील स्नेहभाव कायम असला, तरी तो प्रकट करायला वेळ नाही.
शहरांबरोबरच खेडेगावातील कौटुंबिक आणि सामाजिक स्थितीही बदलली आहे. बहुतेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलला आहेत. सुटी लागल्यावर त्यांना आपल्याच घरी थांबायचे असते. टीव्ही, व्हिडीओ गेम्स, मोबाईलवरील फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप इ.वरील चॅटिंगवर विद्यार्थी व युवक वर्ग व्यस्त आहे.

सोशल मीडियातच  शोधतात आनंद
या माध्यमांद्वारेच तो आपल्या जीवनाचा आनंद शोधत असताना लांबच्या व जवळच्या नात्यांमधील वीण संवादाने घट्ट करण्याची त्याची अजिबात मानसिकता नाही. माणसामाणसांत संवादच राहिलेला नाही; त्यामुळे माणसांपासून तो हरवत चालला आहे.

इतरही कारणांचा शोध हवा
विभक्त कुटुंब पद्धती, आई-वडिलांचेही नातेवाईक आणि समाज यांच्याप्रती असणारे उत्तरदायित्व, नोकरी-व्यवसायात व्यस्त असणारे पालक, त्यांची पैसा मिळण्यासाठीची लढाई, पाल्यांकडून अवाजावी शैक्षणिक अपेक्षा, सुटीतही क्लासची व्यस्तता, वाढती महागाई, नातेवाइकांसाठी खस्ता खाण्याची लोप पावलेली वृत्ती, उच्चशिक्षित आणि अल्पशिक्षणामुळे निर्माण झालेली दरी या गोष्टीदेखील या बदलांना कारणीभूत आहेत.

Web Title: Claim of 'Mama's village' lost ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.