आरोपीला अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवणे गैर असल्याचा दावा
By admin | Published: July 6, 2017 03:32 AM2017-07-06T03:32:54+5:302017-07-06T03:32:54+5:30
हडपसर येथील मोहसीन शेख खून खटल्यातील आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना गेली ३ वर्षे जामीन न झाल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर येथील मोहसीन शेख खून खटल्यातील आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना गेली ३ वर्षे जामीन न झाल्याने येरवडा कारागृहात ठेवले आहे़ कुठलेही सबळ कारण नसताना या खटल्यात अद्याप दोषारोपनिश्चितीचेही काम झालेले नाही़ आरोपीला अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवले जाते हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असून घटनेच्या तरतुदीच्या २१ ची पायमल्ली होत असल्याचा अर्ज अॅड़ मिलिंद पवार व अॅड़ भालचंद्र पवार यांनी विशेष न्यायालयात केला आहे़
मोहसीन शेख खून खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांच्या न्यायालयापुढे सुुरू आहे़ फेसबुकवरील बदनामीकारक मजकुरामुळे हडपसर येथे दंगल उसळली होती़ त्यात २ जून २०१४ रोजी मोहसीन शेख यांचा खून झाला होता़ सरकारच्या वतीने तत्कालीन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोषारोप निश्चित करण्यात यावेत, असा अर्ज दाखल केला होता़ त्यानंतर अॅड़ निकम यांची नियुक्ती सरकारने रद्द केली होती़ मोहसीनचे वडील शेख मोहंमद सादिक यांनी न्यायालयात अर्ज करून या खटल्यात अॅड़ रोहिणी सॅलियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती़ हा खटला ३ वर्षे प्रलंबित आहे़ सरकार पक्षाच्या वतीने कोणीही न्यायालयात उपस्थित राहत नाही़
धनंजय देसाई हे घटनेच्या वेळी घटनास्थळावर हजर नव्हते़ तसेच खुनाचा कट रचला किंवा सहआरोपींबरोबर कटकारस्थान केले, हा सरकार पक्षाचा आरोप सकृतदर्शनी सिद्ध होत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच देऊन धनंजय देसाई यांची याचिका दाखल करून घेतली आहे़ असे असताना आरोपीला अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात ठेवले जाते, ही घटनेच्या तरतुदीच्या २१ ची पायमल्ली होत असून देसाई यांना न्याय मिळावा, असा अर्ज अॅड़ पवार यांनी न्यायालयात केला आहे़ न्यायालयाने अर्ज दाखल करून सरकार पक्षाला त्यावर आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत़ खटल्याची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे़