पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वाहनचालकांकडून साडेपाच हजार रुपये दमदाटी करून काढून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:44+5:302021-02-18T04:16:44+5:30
हरीश कानसकर यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी कानसकर यांनी फसवणूक ...
हरीश कानसकर यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी कानसकर यांनी फसवणूक केली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंकर प्रमोद चोपडे यांनी फिर्याद दिली.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील अवसरी वन उद्यानाजवळ शंकर चोपडे व त्यांचे मित्र मोटासायकलवर मंचर बाजूकडून खेड बाजूला चालले होते. त्यावेळी हरीश महादू कानसकर, सागर संतोष वाघ (दोघे रा. रांजणी ता. आंबेगाव), मनीष हरीश मिलानी (रा. पुणे) व जर्किंग घातलेला एक इसम यांनी चोपडे यांचे वाहन अडवून वाहनाची चावी हातात घेतली. मी विशेष पोलीस अधिकारी असून पीएसआय दर्जाचा अधिकारी आहे, असे म्हणत गाडीचे कागदपत्र लायसन्स दाखवा व याच्यावर गुन्हा दाखल करा, असे सहकाऱ्यांना कानसकर याने सांगितले. त्यादरम्यान सागर वाघ याने फिर्यादीच्या पॅन्टमधील पाकीट काढून त्यातील साडेपाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. सर्व आरोपींनी चोपडे यांना शिवीगाळ व मारहाण करून ते निघून गेले. याप्रकरणी कानसकर याच्यासह इतर तिघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कानसकर यांच्या संदर्भातल्या बातम्या वाचून फिर्यादीने मंचर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहे.