पर्यटक सुखरुप असल्याचा कंपन्यांचा दावा
By admin | Published: April 26, 2015 01:18 AM2015-04-26T01:18:44+5:302015-04-26T01:18:44+5:30
नेपाळसह उत्तर भारतात विविध ठिकाणी गेलेल्या सहलींमधील सर्व पर्यटक सुखरुप असल्याचा दावा संबंधित पर्यटन कंपन्यांनी केला आहे.
पुणे : नेपाळसह उत्तर भारतात विविध ठिकाणी गेलेल्या सहलींमधील सर्व पर्यटक सुखरुप असल्याचा दावा संबंधित पर्यटन कंपन्यांनी केला आहे. तसेच काही कंपन्यांनी नेपाळला जाणाऱ्या सहली तेथील गंभीर परिस्थितीमुळे रद्द केल्या आहेत. उत्तर भारतातील सहली मात्र सुरळीतपणे चालू राहतील, अशी माहितीही कंपन्यांतर्फे देण्यात आली.
नेपाळमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर भारतातही काही राज्यांत भूकंपाचा धक्का बसला. या भागात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच जास्त असते. सध्याही काही पर्यटन कंपन्यांच्या सहली या भागात आहेत. वीणा वर्ल्ड या कंपनीचे महाराष्ट्रातील २८ पर्यटक नेपाळमध्ये आहेत. तर उत्तर भारतातील सिक्कीम, दार्जिलिंग, भूतान या भागात ४०० पर्यटक आहेत.
नेपाळमधील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती वीणा वर्ल्डच्या प्रमुख वीणा पाटील यांनी दिली. त्या म्हणाल्या, की भूकंपामुळे काठमांडूमध्ये जास्त नुकसान झाले आहे. भूकंप झाला तेव्हा सर्व २८ पर्यटक काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात होते. मात्र, या पर्यटकांना काहीही झाले नाही. त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे. अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी आम्हाला सतत सामोरे जावे लागते. हे सर्व पर्यटक आज (रविवारी) मुंबईत परतणार होते. काठमांडू विमानतळ बंद करण्यात आल्याने सध्या ते तिथेच राहतील. विमानतळ सुरू झाल्यानंतर त्यांना मुंबईत आणले जाईल. तसेच काही पर्यटक शनिवारी रात्री जाणार होते. उत्तर भारतातील सर्व सहली नियमितपणे सुरू राहतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
४केसरी टूर्सचे सुमारे २०० पर्यटक उत्तर भारत व नेपाळच्या सहलीसाठी निघाले होते. मात्र, भूकंपामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे नेपाळची सहल रद्द करण्यात आली आहे. या पर्यटकांना घेऊन नेपाळला जाणारे विमान
लखनौमध्येच थांबविण्यात आले आहे. तेथून त्यांना थेट मुंबईत आणले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचा यात समावेश आहे, असे केसरी टूर्सच्या पुणे कार्यालयातून सांगण्यात आले.
४गिरीकंद ट्रॅव्हल्सचे सुमारे ४०० पर्यटक दार्जिलिंग, सिक्कीम, आसाम या भागात आहेत. त्यामध्ये
सुमारे १५० पर्यटक पुण्यातील आहेत. शनिवारी काठमांडूला १२ ते १५ जणांचा ग्रुप दिल्लीहून जाणार होता. मात्र, आता त्यांना परत बोलावण्यात आले आहे. उत्तर भारतातील सर्व पर्यटक सुखरुप आहेत, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक सचिन गोसावी यांनी दिली.