धनादेश न वटल्याने २३ मिळकतधारकांवर दावे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:18+5:302020-12-16T04:28:18+5:30
पुणे : मिळकतकर भरताना दिलेले धनादेश न वटल्याने २३ मिळकतधारकांवर पालिकेतर्फे न्यायालयात दावे दाखल केले आहेत. दावा दाखल होताच ...
पुणे : मिळकतकर भरताना दिलेले धनादेश न वटल्याने २३ मिळकतधारकांवर पालिकेतर्फे न्यायालयात दावे दाखल केले आहेत. दावा दाखल होताच १६ मिळकतधारकांनी कराचा भरणा केला असून, सात जणांवर न्यायालयात दावा सुरु आहे. त्याकरिता स्वतंत्र वकिलाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
नागरिकांनी मिळकतकर भरण्यासाठी आॅनलाईन प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. त्यानुसार नागरिक याच पद्धतीचा सर्वाधिक वापर करीत आहेत. परंतु, काही मिळकतधारक रोख किंवा धनादेशाद्वारे कर भरणा करीत आहेत. यातील २३ धनादेश वटलेच नाहीत. कधी कधी मिळकतधारक वेळ मारुन नेण्याकरिता नुद्दाम न वटनारे धनादेश देतात. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे थकबाकीसाठी तगादा लावावा लागतो. या प्रकारांना आळा बसविण्यासाठी न वटलेल्या धनादेशाप्रकरणी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे धनादेश परत येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कानडे यांनी केले आहे.
====
थकबाकीवरील दंडात ८० टक्के सवलत
पालिकेने स्थायी समितीच्या निर्देशांनुसार २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अभय योजना राबविली. या कालावधीत थकबाकीवरील दंडाच्या रकमेत ८० टक्के सूट देण्यात आली. या काळात १ लाख १४ हजार नागरिकांनी ३५५ कोटींची थकबाकी भरली. त्यांना १८१ कोटींची सूट देण्यात आली आहे. अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून ३१ डिसेंबरपर्यंत शास्तीवर ७५ टक्के सवलत देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पालिका आयुक्तांनीही त्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
====
पुणे महापालिकेने राज्यातील सर्वाधिक मिळकतकर जमा केला आहे. आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे. पुणेकर नागरिकांनी कोरोना काळातही आपले कर्तव्य निभावले असून त्यांच्या सहकार्यामुळे पालिकेचा गाडा व्यवस्थित हाकता येत आहे. मी पुणेकरांचे आभार मानतो. पालिकेने अभय योजना सुरु केली असून त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती