न्यायालयाच्या मुख्य दारातच मिळणार दाव्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:29 AM2020-12-16T04:29:06+5:302020-12-16T04:29:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयीन प्रशासनाकडून पुरविण्यात येणा-या विविध ऑनलाइन सुविधांची माहिती घेणे आता अधिक सोईचे होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : न्यायालयीन प्रशासनाकडून पुरविण्यात येणा-या विविध ऑनलाइन सुविधांची माहिती घेणे आता अधिक सोईचे होणार आहे. पक्षकारांना आपल्या खटल्याची सद्यस्थिती काय आहे, पुढील तारीख कोणती आहे, यासह अनेक बाबींची माहिती पक्षकारांना मिळावी म्हणून न्यायालयाच्या प्रवेश दाराजवळच ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या हस्ते मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यावेळी उपस्थित होते. पक्षकारांना माहिती देण्यासाठी या केंद्रामध्ये एक लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा एक वकील व पॅरा लीगल स्वयंसेवक असणार आहे. न्यायालयीन व्यवस्थेमधील अनेक कामकाज सध्या ऑनलाइन देखील सुरू आहे. मात्र प्रत्येक पक्षकाराला ऑनलाइन सुविधा हाताळणे शक्य होत नाही. त्याबाबतची सुविधा त्यांच्याकडे नाही किंवा त्यांना ही सुविधा कशी वापरायची याची माहिती नसते. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर करत पक्षकारांना अधिक चांगली सुविधा मिळण्यासाठी देशात सर्वच जिल्हा न्यायालयात अशा प्रकारच्या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. सकाळी साडेदहा वाजता सुरू होणारे हे केंद्र न्यायालयीन कामकाजाच्या वेळेपर्यंत खुले राहणार आहे. येथील सुविधांचा पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणती माहिती मिळणार
: - दाव्याची सद्यस्थिती काय आहे - सुनावणीची पुढील तारीख कोणती - व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी कशी घेतली जाते - कैद्यांच्या ऑनलाईन मुलाखतीची प्रक्रिया - आदेश, निकालाची सॉफ्ट कॉपी ई-मेल, व्हाट्सअपद्वारे देण्यात मदत
........................................
केंद्राचा उपयोग नेमका कशासाठीॽ
- ऑनलाइन दावे दाखल करण्यात साहाय्य - ई-स्टॅम्प व ई-पेमेंटसाठी मदत - सर्टीफाईड कॉपी मिळवण्यासाठी - डिजिटल सहीसाठी अर्ज - वाहतूक विभागाचे इ-चलनाचे दावे व्हर्च्युअल न्यायालयात निकाली काढण्यात मदत - ई कोर्ट ॲप डाऊनलोड करण्यासाठी जनजागृती
केंद्राचे नेमके ठिकाण : शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील प्रवेशद्वार क्रमांक चारमधून आत आल्यानंतर जुन्या इमारतीच्या शेजारी
...................
फोटो ओळी जिल्हा न्यायालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई सेवा केंद्राचे मंगळवारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.