Pune | संख्या घटल्याचा दावा, पण पुणे शहरात श्वानांचा वाढला चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:44 AM2023-04-27T08:44:46+5:302023-04-27T08:45:11+5:30
पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत ४२ टक्क्यांनी घट...
पुणे : शहरात नुकत्याच केलेल्या गणनेनुसार भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये असलेली कुत्र्यांची ३ लाख १५ हजार ही संख्या आता १ लाख ७९ हजार ९४० इतकी कमी झाली आहे. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या ४२.८७ टक्क्यांची घटली आहे. मोठ्या प्रमाणावर केलेली नसंबदी, लॉकडाऊनमध्ये कुत्र्यांची झालेली उपासमारी, उघड्यावर कचरा टाकण्याची ठिकाणे कमी झाल्याने कुत्र्यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांना चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पुणे महापालिकेने २०१८ नंतर भटक्या कुत्र्यांची गणना केली नव्हती. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या किती? यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने हे काम क्यूआर कोड सोल्युशन्स या संस्थेला दिले होते. या संस्थेने नुकतीच भटक्या कुत्र्यांची गणना केल्याचा अहवाल पुणे महापालिकेला सादर केला.
संख्या कमी होण्याची प्रमुख कारणे
पुणे महापालिकेने गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये भटक्या कुत्र्यांची उपासमार झालेली आहे. नसंबदी, लॉकडाऊनमध्ये कुत्र्यांची झालेली उपासमारी, उघड्यावर कचरा टाकण्याची ठिकाणे कमी झाल्याने शहरात उघड्यावर कचरा टाकण्याची ठिकाणे कमी झाली आहेत. त्यामुळे कुत्र्यांची वाढ होण्यासाठीची संसाधने कमी झाली आहेत.
भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना प्रचंड त्रास
पुणे शहरात हॉटेल्स, खाऊगल्ल्या, कचरापेट्या, मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आढळतात. गल्ली बोळांमध्ये समूहाने राहणारी भटकी कुत्री रात्री-अपरात्री गाड्यांवर धावून जातात. वाहन चालकाच्या पायाचा चावा घेतात. पदपथांवर चालणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने नागरिक करत आहेत.
१६ हजार भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा
शहरात गेल्या वर्षभरात तब्बल २१ हजार लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार यातील १६ हजार ७७ घटना या भटकी कुत्री चावल्याच्या आहेत, तर पाच हजार ४१० घटना या पाळीव कुत्री चावल्याच्या आहेत. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी आकडा असल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे.
पाच वर्षांत ८५ हजार १३३ कुत्र्यांवर नसबंदी
पुणे महापालिकेने गेल्या पाच वर्षांत ८५ हजार १३३ कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली आहे. २०१८ -१९ मध्ये ११ हजार २३४, २०१९- २० मध्ये १९ हजार ३६०, २०२०- २१ मध्ये १४ हजार १३७, २०२१- २२ मध्ये १३ हजार १४८, २०२२- २३ मध्ये २७ हजार २५४ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे.
भटकी कुत्री चावल्याच्या घटना
२०१९ - १२ हजार २५२
२०२० - १२ हजार ७३४
२०२१ - १५ हजार ९७२
२०२२ - १६ हजार ०७७
रेबीजच्या रुग्णांच्या संख्येत घट
२०१८ - २२०
२०१९ - २४६
२०२० - २०९
२०२१ - ७१
२०२२ - ७०
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘क्यूआर कोड सोल्युशन्स’ संस्थेला भटक्या कुत्र्यांच्या गणनेचे काम दिले होते. त्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत संख्या ४२ टक्कांनी घट झाली आहे.
- डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, पुणे महापालिका