प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांबाबत स्पष्टता द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:03+5:302021-04-27T04:10:03+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्न महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण येत्या ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने जमा ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्न महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण येत्या ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत ई-मेल द्वारे कळविले. परंतु,परीक्षा झालेल्या नसताना गुण कसे भरायचे यावरून महाविद्यालय स्तरावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत स्पष्टता देणारे परिपत्रक प्रसिद्ध करावे, अशी सूचना विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोरोनामुळे महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाहीत. परीक्षा झालेल्या नसताना विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण जमा करण्याबाबत ई-मेलद्वारे सूचना पाठविल्या. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत वर्षाअखेरीस प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण जमा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला असताना विद्यापीठाकडून महाविद्यालयांना या पद्धतीचा ई-मेल कसा पाठविण्यात आला. याबाबत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांनी प्रात्यक्षिक परीक्षांबाबत महाविद्यालयांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आणखी काही महिने सुधारणा झाली नाही; तर प्रात्यक्षिक परीक्षा कशा द्याव्यात व त्यांचे गुण विद्यापीठाला कसे द्यावेत, याबाबत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सुद्धा गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे विद्यापीठाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
-----------
प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण पाठविण्यास संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळ दूर व्हावा आणि त्यात स्पष्टता यावी, यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ