Pune | लहान मुलांच्या भांडणात दोन कुटुंबांत हाणामारी; लोणीकंद पाेलिसांकडून १५ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 08:45 PM2023-03-07T20:45:16+5:302023-03-07T20:46:06+5:30
याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
पुणे : लहान मुलांची खेळताना भांडणे झाल्याने दोन कुटुंबांत हाणामारी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन प्रभाकर आव्हाळे (वय ३८, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य दादासाहेब आव्हाळे, महेश संभाजी कुटे, कौशल कैलास आव्हाळे, सिद्धांत प्रवीण आव्हाळे, कैलास किसन आव्हाळे, दादासाहेब गोविंद आव्हाळे, मंदाकिनी दादासाहेब आव्हाळे, आदिती दादासाहेब आव्हाळे, सुवर्णा प्रवीण आव्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन आव्हाळे यांचा ११ वर्षांचा मुलगा आणि प्रदीप आव्हाळे यांचा १० वर्षांचा मुलगा यांच्यात खेळताना झालेल्या भांडणातून आरोपींनी सचिन यांच्या मोटारीवर दगड मारले. दांडके आणि कोयत्याने सचिन यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. सचिन यांची आई शारदा यांच्या डोक्यात काेयता मारला तसेच सचिन यांच्या वडिलांना गजाने मारहाण केल्याचे सचिन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, प्रवीण विठ्ठल आव्हाळे (वय ४०, रा. कॅनेरा बँकेजवळ, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन पिराजी आव्हाळे, नामदेव पिराजी आव्हाळे, पल्लवी सचिन आव्हाळे, नामदेव पिराजी आव्हाळे यांच्या पत्नीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण यांचा मुलगा वेदांत आणि आरोपी सचिन यांचा मुलगा स्वराज यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपी सचिन आणि कुटुंबीयांनी प्रवीण यांचे वडील विठ्ठल, वहिनी, भाऊ दादासाहेब, पुतण्या आदित्य आणि वेदांत यांना गजाने मारहाण केल्याचे प्रवीण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक कोळपे आणि लिंगे तपास करीत आहेत.