Pune Crime: कंपनीच्या कामावरुन दोन टोळ्यांमध्ये हाणामारी, सराईत गुन्हेगारासह ६ जणांना अटक
By नितीश गोवंडे | Published: January 29, 2024 02:36 PM2024-01-29T14:36:51+5:302024-01-29T14:37:35+5:30
हा प्रकार शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एअरपोर्ट रोडवरील मालपाणी ग्रुप येथे घडला आहे....
पुणे : कंपनीकडून मिळालेल्या लोडिंग अनलोडिंगच्या कामावरुन दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून १४ जणांवर गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगारासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एअरपोर्ट रोडवरील मालपाणी ग्रुप येथे घडला आहे.
विपीन सत्यवान खंडागळे (३५, रा. रामवाडी, नगररोड) याने दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी सनी करमवीर ढिल्लोड (३२), विकास चव्हाण (३३), गणेश ढिल्लोड (२५) आणि शुभम ढिल्लोड (२४) यांना अटक केली असून सनी ढिल्लोड हा सराईत गुन्हेगार आहे. तर रवी शिंदे (३५), सुशिल चव्हाण (३४), अनिल ढिल्लोड (३८), सत्यम ढिल्लोड (२५), सोमनाथ वडमारे आणि शाम वडमारे (२६) यांच्यासह इतर अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन खंडागळे हे एवीएस कंपनीमार्फत लेबर सप्लायर्स व मेंटेनन्स वर्कचे काम करतात. त्यांच्या कंपनीला मालपाणी ग्रुपचे लोडिंग अनलोडिंगचे काम मिळाले आहे. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना दमदाटी केली. तसेच हे काम सनी ढिल्लोड याला करायचे आहे. तुम्हाला हे काम करायचे असेल तर पैसे, माथाडी द्यावी लागेल असे म्हणत खंडणीची मागणी केली. तसेच कामाची वर्क ऑर्डर दाखवण्यासाठी फिर्यादी खंडागळे यांच्यावर दबाव टाकला. त्यावेळी वर्क ऑर्डर दाखवण्यास नकार दिला असता आरोपींनी विपीन खंडागळे यांना शिवीगाळ करुन डोक्यात लोखंडी रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी यांचे पार्टनर शेवराव यादव याला दगडाने तसेच हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नांगरे करत आहेत.
तर सनी करमवीर ढिल्लोड (३२, रा. सिद्धार्थ नगर, रामवाडी) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विपीन सत्यवान खंडागळे (३५), शेवराव उर्फ शाहू यादव (३७) यांना अटक केली आहे. तर अभिजीत रोकडे व एका अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी ढिल्लोड व त्याचे मित्र विकास चव्हाण रवी शिंदे, सुशील चव्हाण हे मालपाणी बिल्डरच्या साईटवर लोडिंग अनलोडिंग च्या कामासाठी विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विपीन खंडागळे व शेवराव यादव यांनी फिर्यादी याला ‘तू कोण आम्हाला विचारणारा, तू काय इथला भाई आहे का’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच ‘माझ्या धंद्यात आड येतो का, मी तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत खाली पाडून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारला असता सनी याने हात मध्ये घातल्याने हात फ्रॅक्चर झाला. आरोपींनी सनी याच्या कारवर दगड मारून नुकसान केल्याचे देखील सनी ढिल्लोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आळेकर करत आहेत.