Pune | टोळी वर्चस्वातून उत्तमनगरात दोन गटांत हाणामारी; ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 10:29 AM2023-01-03T10:29:53+5:302023-01-03T10:30:01+5:30
पोलिसांकडून दोन्ही टोळ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल...
पुणे : उत्तमनगर परिसरात वर्चस्वाच्या वादातून नववर्षाच्या सुरुवातीला गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात एकमेकांवर कोयत्याने वार करत दगड, फरशीने हाणामारी करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोन्ही टोळ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून ७ जणांना अटक केली आहे.
याबाबत गौरव गणेश धावडे (वय २२, रा. उत्तमनगर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक शर्मा (वय २१), मंगेश ठाकूर (वय २३), गुण्या ऊर्फ निरज हिनोटिया (वय १९), सोहेल सय्यद (वय २२) यांना अटक केली आहे, तर त्यांचे साथीदार प्रसाद दांगट, लड्डू परदेशी, झप्या ऊर्फ गौस परदेशी, निखिल कंधारे, किशोर अडागळे, दाद्या सांळुखे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केले असून मंगेश ठाकूर, किशोर अडगळे, गुण्या हिनोटिया हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. हा प्रकार उत्तमनगरमधील मासेआळीत ३१ डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे लघुशंकेसाठी थांबले असताना प्रसाद दांगट व लड्डू परदेशी तेथे आले. त्यांनी तू काय मोठा भाई झालास का? असे म्हणून शिवीगाळ केली. त्याचवेळी इतर आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तेथे पडलेली दगडे फेकून मारली. तेव्हा फिर्यादी हे आत्याच्या घरी पळून गेले. त्यानंतर पुन्हा लाँड्रीच्या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आले असता इतर आरोपींनी त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
याविरोधात कार्तिक प्रसाद शर्मा (वय २१, रा. मासेआळी, उत्तमनगर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव धावडे (वय २२) आणि प्रसाद कोळी (वय २२, रा. उत्तमनगर) या गुन्हेगारांना अटक केली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या घरासमोर उभे असताना गौरव धावडे व प्रसाद कोळी तेथे आले. तू मोठा भाई झालास का? डोळे फाडून काय बघतोय, असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. गौरव याने याला आज जिवे मारून टाकू, असे म्हणून रस्त्यावरील फरशी उचलून ती फिर्यादीच्या डोक्यात मारली. प्रसाद याने उजव्या डोळ्यावर बुक्की मारून जखमी केले. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.