झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक
By नम्रता फडणीस | Updated: March 11, 2025 17:41 IST2025-03-11T17:40:36+5:302025-03-11T17:41:23+5:30
पुर्नविकास होण्याच्या नावाखाली १० वर्षांपूर्वी वसाहतीतील लोकांकडून जबरदस्तीने फॉर्म भरुन घेण्यात आले.

झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक
पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा झोपडपट्टी पुर्नविकास (एसआरए) मार्फत पुर्नविकास होणार आहे. परंतु, त्याला अनेकांचा विरोध आहे. वसाहतीच्या पुर्नविकासावरुन झालेल्या या मतभेदातून दोन गटांमध्ये मारामारी झाली. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील पाच जणांना अटक केली आहे. ही औंध येथे ९ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत अतुल शाम चव्हाण (वय २८, रा. औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी योगेश भोसले (रा. पिंपळे गुरव), मनोज ठोसर, गफूर शेख (रा. औंध) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार राजू निरवणे, किरण निरवणे, बाबा शेख, जुबेर शेख, राम कांबळे (रा. पुणे), लक्ष्मण (रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वसाहतीत ४१२ झोपड्या आहेत. त्यांचे पुर्नविकास होणार आहे. १० वर्षांपूर्वी वसाहतीतील लोकांकडून जबरदस्तीने फॉर्म भरुन घेण्यात आले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने कोणालाही काही लेखी दिले नाही. लोकांना किती स्क्वेअर फुट घर मिळणार याविषयी लोकांना काहीही लेखी देण्यात आलेले नाही. त्यामुळे वसाहतीतील ९५ टक्के लोकांचा विरोध आहे. योगेश भोसले व इतरांनी बाहेरुन मुलांना आणून अतुल शाम चव्हाण , त्यांचे मामा व आजी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील लोखंडी शस्त्र दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, याविरोधात योगेश किशोर भोसले (वय ३८, रा. औंध) यांनीही चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अतुल चव्हाण आणि आमोल कांबळे (रा. डॉ. आंबेडकर वसाहत, औंध) यांना अटक केली आहे. विशाल पेटकर, सूरज समिंदर, प्रदिप ठोसर, दीपक कांबळे, अजिंक्य गाडे व कमलेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाने या गुन्हयाचा तपास करीत आहेत.