गजा मारणे टोळीकडून येरवडा कारागृहात राडा; जेवणाचा पाटा डोक्यात घातला, १ जखमी
By विवेक भुसे | Published: May 11, 2023 09:38 AM2023-05-11T09:38:09+5:302023-05-11T09:38:57+5:30
रात्री अॅडमिशन चेकींग सुरु असताना या गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उदभवला. यावेळी एकाने दुसर्या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो जखमी झाला
पुणे - मोक्का अंतर्गत जेरबंद असलेल्या गजा मारणे टोळीतील गुंडांनी बुधवारी रात्री येरवडा कारागृहात राडा घातला. त्यात जेवणाचा पाटा डोक्यात घातल्याने एक जण जबर जखमी झाला आहे.
येरवडा कारागृहात वेगवेगळ्या बराकीत मोक्का अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेले ७०० ते ८०० गुन्हेगार आहेत. त्यांच्यात अधुनमधून कुरबुरी सुरु असतात. कारागृहात बुधवारी दुपारी कॅरम खेळत असताना कैद्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी तेथील जेल सुरक्षा रक्षकांनी ही भांडणे सोडवली. त्यानंतर सर्व जणांना त्यांच्या बराकीत बंद करण्यात आले होते.
रात्री अॅडमिशन चेकींग सुरु असताना या गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उदभवला. यावेळी एकाने दुसर्या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो जखमी झाला. सुरक्षा रक्षकाने त्यांना तातडीने बाजूला केले. त्यानंतर या सर्व गुंडांची वेगवेगळ्या बराकीत रवानगी करण्यात आली.
याबाबत येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, रात्री कारागृहात कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यात एक जण जखमी झाला आहे. त्या कैद्यांना आता वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे. आज त्यांचे जबाब घेऊन आवश्यक ती तक्रार दाखल करण्यात येणार आहे.