लोहगावात दोन गटांत हाणामारी
By admin | Published: October 14, 2016 04:59 AM2016-10-14T04:59:58+5:302016-10-14T04:59:58+5:30
किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादामधून लोहगावात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक
येरवडा : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादामधून लोहगावात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत वाहनांची जाळपोळ केल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एका गटाने दुसऱ्या समाजाच्या वस्तीवर हल्ला चढविल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शांततेचे आवाहन केले. दोन्ही गटांतील लोकांवर विमाननगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शुभम गरूड, शिवा वाघे, सौरभ शेळके यांच्यासह सुमारे ८० जणांवर दंगलीचा तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप राखपसरे (वय २८, रा. साखरे वस्ती, लोहगाव) याने फिर्याद दिली आहे. तर नवाझ शेख (वय १९, रा. लोहगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश राखपसरे, अतुल, राहुल राखपसरे, सचिन, नागेश
राखपसरे, नितीन राखपसरे यांच्यासह सुमारे ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात झालेल्या मराठा मूक मोर्चावेळी लोहगावातील उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना टी शर्टचे वाटप करण्यात आले होते. हाच टी शर्ट घालून नवाझ शेख कामावर जात असताना आरोपी राखपसरे त्याला चिडवायचे. बुधवारी रात्री तो मौजे आळीमधून जात असताना आरोपींनी त्याला एकटे गाठून मारले.
त्यामुळे तब्बल ३० जणांचा जमाव राखपसरे वस्तीवर जमा झाला. राखपसरेच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या आई आणि पत्नीला मारहाण करण्यात आली. वस्तीमध्ये उभ्या असलेल्या मोटारी, टेम्पो, टँकरच्या काचा फोडण्यात आल्या. जमावाने एक मोटारही पेटवून दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त वसंत तांबे आणि सहायक निरीक्षक एम. एम. तोगरवाड करीत आहेत.