पुलंचे वाङ्मय जपानी विद्यार्थ्यांच्या मुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:24 AM2018-12-11T04:24:25+5:302018-12-11T04:24:41+5:30
मासाहारू तोयोहारा हा जपानच्या शाळेतील विद्यार्थी सिंहगड रस्त्यावरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात उभा राहिला आणि त्याने थेट पुलंची कथा व तीही चक्क मराठीतून सुरू केली.
पुणे : मासाहारू तोयोहारा हा जपानच्या शाळेतील विद्यार्थी सिंहगड रस्त्यावरच्या पु. ल. देशपांडे उद्यानात उभा राहिला आणि त्याने थेट पुलंची कथा व तीही चक्क मराठीतून सुरू केली. ती संपल्यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट विरतोय न विरतो तोच त्याने व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ही तितक्याच ताकदीने सुरू केली आणि उपस्थितांना चकित केले.
‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान, पुणे’ या संस्थेने पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु. ल. देशपांडे उद्यानात रविवारी सकाळी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सन १९६०मध्ये पुलंनी मराठी मनाला आपल्या ‘पूर्वरंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून जपानची ओळख करून दिली होती त्याचे स्मरण या वेळी सर्वांनाच झाले. पुलंबरोबरच माडगूळकर व अन्य काही साहित्यिकांच्या साहित्यकृतींचेही वाचन या वेळी करण्यात आले. काही जपानी विद्यार्थ्यांबरोबरच जपानी भाषा शिकणारे मराठी विद्यार्थीही यात सहभागी होते. जपानमधील एका शहराच्या सहकार्यानेच पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले असल्याने या सगळ्याच कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. समीर खळे, मुंबईतील जपानी वकिलातीमधील वरिष्ठ अधिकारी युकिओ अचिदा, माजी अधिकारी हिरोबुगी नाकाजिमा, पुण्यात जपानी भाषेचा शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मिचिको तेंडुलकर, जपानमधील वाकायम प्रांताचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी तात्सुनोरी ओनिशी, संस्थेच्या समन्वयक स्वाती भागवत, सचिव आमोद देव, जयश्री भोपटकर या वेळी उपस्थित होते. श्रद्धा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.
मन हेलावणाºया सत्यकथा
लोकप्रिय जपानी कथा, कविता, हायकू यांचा मराठी अनुवाद व त्याचे अभिवाचनही काही जणांनी सादर केले. सलील वैद्य यांनी दुसºया महायुद्धातील ३ हत्तींच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या सत्यकथेने नागरिकांची मने हेलावली.
बकुल वैद्य, सिद्धी जोशी, मुग्धा भालेराव यांनी एक जपानी कथा सांगितली. चेतना गोसावी, श्रीमती स्वाती भागवत, अद्वैता उमराणीकर, मीना हुननूरकर, जयश्री भोपटकर, स्वराली बापट आदींनी यांनी जपानी हायकूंचा सुरेख अनुवाद सादर केला. काही कथाही त्यांनी ऐकवल्या.